होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राणीबागेत अवतरणार डॉल्फिन, स्टारफिश, कासवदेखील

राणीबागेत अवतरणार डॉल्फिन, स्टारफिश, कासवदेखील

Published On: Feb 08 2018 1:48AM | Last Updated: Feb 08 2018 1:30AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबईतील अरबी समुद्रात डॉल्फिन दिसणे तसे दुर्मीळच.. यासाठी थेट गोवा गाठावे लागते. तर स्टारफिश, ऑक्टोपस, कासव यासारखे जलचर बघायचे झाले तर आपल्याला मत्स्यालयात जावे लागते. मात्र आता हे जलचर भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयात (राणीबाग) येथे अवतरणार आहेत. 

भायखळा येथील राणीबागेत 9 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत उद्यान प्रदर्शनाचे आयोजिन करण्यात आले आहे.  या प्रदर्शनात जलपरी, डॉल्फिन, स्टारफिश, ऑक्टोपस, कासव, बदक, मगर, खेकडा, अ‍ॅॅनाकोंडा, इत्यादींच्या फुलांपासून तयार केलेल्या प्रतिकृती ठेवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या प्रतिकृती ठेवण्यासाठी सुमारे 100 मीटर लांबीची एक कृत्रिम नदी तयार करण्यात आली असून तिच्यात एक फुलांनी सजवलेला शिकारा असणार आहे. या प्रतिकृती आणि कृत्रिम नदी साकारण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागातील 40 कामगार, कर्मचारी व अधिकारी गेले तीन महिने दिवस रात्र मेहनत घेत असल्याचे महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.

महापालिकेच्या उद्यान खात्याच्या वतीने दरवर्षी उद्यान विषयक प्रदर्शन आयोजित करण्यात येते. या प्रदर्शनात गेल्यावर्षीपासून एक विषय घेऊन त्यावर आधारित पुष्परचना, वृक्षरचना विशेषत्वाने प्रदर्शित करण्यात येतात. या वर्षी जलप्रदूषणाबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने कृत्रिम नदी तयार करण्यात आली असून पानाफुलांपासून तयार करण्यात आलेली लहानग्यांची आवडती जलपरी आणि शिकारा देखील या नदीमध्ये असणार आहे.  

या प्रदर्शनात कुंड्यांमधील शोभीवंत झाडे, पुष्परचना, फुलझाडे, लॅण्डस्केप आर्ट आदी विविध विषयांवरील स्पर्धा देखील आयोजित करण्यात येणार आहेत. या स्पर्धांमध्ये शासकीय, निमशासकीय यासह खासगी क्षेत्रातील संस्था, कंपन्या सहभागी होऊन आपली पर्यावरणपूरक कला सादर करणार आहेत. या प्रदर्शनात विविध प्रजातींची 10 हजारांपेक्षा अधिक झाडे बघावयास मिळणार आहेत. यात फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोनसाय, वेली यांचा समावेश आहे.