Tue, Apr 23, 2019 07:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › झोपमोड झाली म्हणून डॉक्टरची चिमुरड्याला टॉर्चने मारहाण 

झोपमोड झाली म्हणून डॉक्टरची रुग्णाला मारहाण

Published On: May 30 2018 10:18AM | Last Updated: May 30 2018 11:50AMमुंबई : प्रतिनिधी

तपासणी करण्यासाठी झोपेतून उठवल्याचा राग आल्याने एका डॉक्टरने सहा वर्षांच्या मुलाच्या डोक्यात टॉर्च मारल्याची धक्कादायक घटना सेंट जॉर्ज रुग्णालयात घडली. यामुळे सहा वर्षांच्या मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. धक्कादायक बाब म्हणजे टॉर्च लागल्यानंतर मुलाच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू झाल्यावरही डॉक्टर तिथे थांबले नाही. गौरव मौर्या असे या डॉक्टरचे नाव असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

विक्रोळीचा रहिवासी असणार्‍या सहा वर्षांच्या सूर्यांश गुप्ताला कैची लागल्याने रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री त्याला त्रास होत असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी डॉक्टर गौरव मौर्या यांना बोलावले. मौर्या यांनी सुरुवातीला डोळ्यांच्या तपासणीसाठी टॉर्च सुरु केला. त्यावेळी अतिशय त्रास होत असल्याने सूर्यांश रडू लागला. त्यामुळे मौर्या तिथून निघून गेले. 

थोड्या वेळाने पुन्हा सूर्यांशला त्रास झाल्यावर त्याच्या कुटुंबियांनी मौर्या यांना बोलावले. त्यावेळी मौर्या झोपले होते. त्रास होत असल्याने सूर्यांश तपासताना मौर्या यांना सहकार्य करत नव्हता. त्यामुळे झोपमोड झालेल्या मौर्या यांनी त्यांच्या हातात असलेला टॉर्च जोरात सूर्यांशच्या डोक्यावर मारला. त्यामुळे रक्तस्राव सुरु झाला. मात्र त्याकडे न पाहता मौर्या तिथून निघून गेले. रात्री साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने मौन पाळले आहे. 

मौर्या यांनी टॉर्च मारल्यामुळे सूर्यांशच्या डोक्याला दुखापत झाली. त्याच्या डोक्याला सहा टाके पडले आहेत. मौर्या यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून रुग्णालय प्रशासनाने या घटनेची अंतर्गत चौकशी सुरु केली आहे. याशिवाय रुग्णालय प्रशासनाने मौर्या यांना सक्तीच्या रजेवरदेखील पाठवले आहे.