Thu, Apr 25, 2019 11:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अपंग आणि महिला डब्यांवरील बोधचिन्हे  तुम्हाला तरी दिसतात का? : उच्च न्यायालय

अपंग आणि महिला डब्यांवरील बोधचिन्हे  तुम्हाला तरी दिसतात का? : उच्च न्यायालय

Published On: Jul 21 2018 1:31AM | Last Updated: Jul 21 2018 1:07AMमुंबई : प्रतिनिधी  

शहरातील उपनगरीय रेल्वेगाड्यांमध्ये महिला आणि अपंगांसाठी आरक्षित असलेल्या डब्यांबरील बोधचिन्हे तुम्हाला तरी दिसतात का? असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित करून  रेल्वे प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. तुम्ही याबाबत काही कारणे सांगू नका, आठ दिवसांत डब्यांवरील ही बोधचिन्हे  सर्वसामान्यांना दिसतील अशी मोठी आणि ठळक करा, असा आदेशच रेल्वे प्रशासनाला दिला. या आदेशाची आठ दिवसांत अंमलबजावणी करा, असेही न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला बजावले.

गर्दीच्यावेळी अपंगांच्या डब्यात चार रेल्वे पोलीस कर्मचार्‍यांनी केलेल्या घुसखोरीच्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते राहुल शेळके यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल  केली आहे. अशा पोलिसांचा बंदोबस्त करा, त्यांच्याविरोधात कारवाई करा अशी विनंती केली होती. त्या याचिकेवर न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील अ‍ॅड. कविता साळुंके यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून संबंधित पोलिसांविरोधात करण्यात गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली.  

आधी रेल्वेच्या डब्यावरही रस्त्यावर असणार्‍या झेब्रा पद्धतीचे पट्टे काढून टाका आणि  या डब्यांवर महिला आणि अपंगांसाठीचे मोठे ठळक बोधचिन्ह काढा, असे बजावले. यावेळी रेल्वे प्रशासनाकडून दोन आठवड्यांचा वेळ देण्याची विनंती करण्यात आली. यावेळी न्यायालयाने पुन्हा प्रशासनाला धारेवर धरले. एवढे दिवस कशाला लागतात? तुमचे दिल्लीकडे परवानगी मागण्याचे उद्योग आता थांबवा. आठ दिवसांत  सर्व बोधचिन्हे मोठी आणि ठळक करा, असा आदेशच न्यायालयाने दिला.