Fri, May 24, 2019 08:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्लास्टिकवरून लोकांना भडकवू नका : रामदास कदम

प्लास्टिकवरून लोकांना भडकवू नका : रामदास कदम

Published On: Jun 26 2018 1:15AM | Last Updated: Jun 26 2018 12:59AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

प्लास्टिक पिशवी वापरली म्हणून कोणी दंड आकारल्यास मनसे कार्यकर्त्यांशी संपर्क करा, असे आवाहन करणार्‍यांनी लोकांना चिथावणी देऊ नये. त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता दिला आहे. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व पुढे येत असल्यामुळे काही लोकांना पोटशूळ उठला आहे, अशा शब्दांतही त्यांनी राज यांच्यावर निशाणाही साधला.

मंत्रालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पर्यावरणमंत्री कदम बोलत होते. प्लास्टिक बंदीवर सरकारने पर्यायी व्यवस्था केली नसल्यामुळे नागरिकांनी प्लास्टिक बंदीला विरोध करावा, या मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या आवाहनाचा कदम यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून सरकारने वरळी बाजारात कापडी पिशव्या उपलब्ध केल्या आहेत. घराबाहेर न पडणार्‍या राज ठाकरेंनी जवळच्या बाजारात डोकवावे, असा खोचक सल्ला कदम यांनी दिला.

सरकार सामान्य जनतेवर कठोर कारवाई करणार नाही, तर प्लास्टिक उत्पादक सरकारचे लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उत्पादक आणि वितरक सरकारच्या रडारवर आहेत. सामान्य जनतेने घाबरून न जाता प्लास्टिक बंदीला सहकार्य करावे. हा अचानक घेतलेला निर्णय नसून नऊ महिन्यांपूर्वी तो जाहीर केला होता. त्यामुळे जनतेने प्लास्टिक पिशव्यांऐवजी आता कापडी पिशव्या वापरण्याचे बंधन स्वतः घालून घेतले पाहिजे. सरकारने घेतलेला हा निर्णय जनतेच्या भल्यासाठीच असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.