Wed, Apr 24, 2019 15:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पसंत नसलेल्या वराला दिले चॉकलेटमधून विष 

पसंत नसलेल्या वराला दिले चॉकलेटमधून विष 

Published On: Aug 21 2018 1:38AM | Last Updated: Aug 21 2018 1:17AMभिवंडी : वार्ताहर

कुटुंबीयांच्या संमतीने वधू-वराने एकमेकांना पसंत केले. अवघ्या काही दिवसांतच लग्नाचा बार उडणार होता. मात्र चार महिने उलटल्यानंतर वधूला नवरा मुलगा पसंत नसल्याने तिने भावी पतीला चॉकलेटमधून विष देऊन त्याला ठार मारल्याची धक्कादायक घटना भिवंडीत घडली आहे. अरकम शमसुद्दीन अन्सारी (24, रा. उस्मानी अपार्टमेंट) असे मृत वराचे नांव आहे. याप्रकरणी समरीन अली अहमद अन्सारी (20) हिच्याविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.

अरकम याचे चार महिन्यांपूर्वी कुटुंबीयांच्या सहमतीने समरु बाग, आजमीनगर येथील तरुणी समरीन हिच्याशी निकाह ठरला होता. त्यानंतर मोबाईलवरून दोघांमध्ये गुफ्तगू सुरू होते. मात्र अचानकपणे वधू समरीन हिचे अरकम याच्यावरून मन उडाले व त्याच्याशी बोलताना तुला पाहून माझ्या मनात घृणा निर्माण होते, तू मला पसंत नाही, तू माझ्या जीवनातून निघून जा’ अशी बोलू लागली. तेवढ्यावरच बोलून ती न थांबता जर माझ्यावर तुझा जीव असेल तर मी दिलेले विष तू खाऊन टाक? असे बोलून तिने चॉकलेटला विषारी औषध लावून ते खाण्यास दिले.

भावी पत्नीचे मन जिंकण्यासाठी अरकम याने विषारी चॉकलेट खाल्ले. मात्र, तो काही वेळातच बेशुद्ध पडला. सदर घटना कुटुंबीयांच्या लक्षात येताच अरकम यास तातडीने स्व. काशिनाथ पाटील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र चार दिवसांच्या उपचारानंतर अरकम याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र पोलीस तपासात समरीन हिने चॉकलेटला विष लावून ते खाण्यास दिले. त्यामुळे अरकमचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी सिमरन हिच्याविरोधात भादंवि. 306 प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल केला. तिला सोमवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला 23 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.