Sun, Aug 25, 2019 03:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'निपाह' व्हायरसमुळे घाबरून जाऊ नये : आरोग्यमंत्री

'निपाह' व्हायरसमुळे घाबरून जाऊ नये : आरोग्यमंत्री

Published On: May 22 2018 7:49PM | Last Updated: May 22 2018 7:49PMमुंबई : पुढारी ऑनलाईन  

केरळमध्ये उद्भवलेल्या निपाह विषाणुच्या आजारासारखा एकही रुग्ण महाराष्ट्रात आढळलेला नाही. याबाबत घाबरण्यासारखी कोणतीही परिस्थिती राज्यात नाही, पण तरीही या आजारासंदर्भातील काही लक्षणे आढळल्यास रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले आहे. राज्यात या आजाराचा एकही रुग्ण नसला तरी खबरदारीचे उपाय म्हणून सर्व शासकीय तसेच खासगी रुग्णालयांना यासंदर्भातील आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.  मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयासह राज्यातील प्रमुख शासकीय रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष (isolation ward) सुरु करण्याबाबत सूचीत करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. सावंत यांनी  मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

मंत्रालयात आज मंत्री डॉ. सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक झाली, त्यात या आजारासंदर्भात घ्यावयाच्या खबरदारीच्या उपाययोजना निश्चित करण्यात आल्या. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री डॉ. सावंत बोलत होते. बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त डॉ. संजिवकुमार, आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे, संसर्गजन्य रोग प्रतिबंधक समितीचे सदस्य डॉ. ओम श्रीवास्तव, अतिरिक्त अभियान संचालक डॉ. सतिश पवार आदी उपस्थित होते.

मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, रुग्णालये, डॉक्टर तसेच नर्सेस यांनी या आजारासंदर्भात घ्यावयाची काळजी आणि करावयाच्या उपाययोजना यासंदर्भातील मार्गदर्शिका राज्यातील सर्व रुग्णालयांना पाठविण्यात येत आहे. निपाह विषाणू आजारात विशेषत: ताप, अंगदुखी, डोकेकुखी, झोपाळलेपणा, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे आढळतात. विशेषत: केरळ भागातून प्रवास करुन आलेल्या व्यक्तिंमध्ये अशी लक्षणे आढळल्यास त्याबाबत तातडीने दखल घेण्यात यावी. अशा रुग्णांनी तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल व्हावे. असे आवाहन त्यांनी केले.

राज्यात या रोगासंदर्भात एकही रुग्ण आढळलेला नाही. पण तरीही खबरदारीच्या उपाययोजना म्हणून राज्यातील सर्व खासगी आणि शासकीय रुग्णालये, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक यांना सूचीत करण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. लोकांनीही खबरदारीचा उपाय म्हणून या विषाणुचा प्रादुर्भाव झालेल्या केरळमधील कोझीकोडे व इतर परिसरातील प्रवास टाळावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.