Wed, Nov 21, 2018 09:18



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नाणार जमिन अधिग्रहण अधिसूचना रद्द : सुभाष देसाई

नाणार जमिन अधिग्रहण अधिसूचना रद्द : सुभाष देसाई

Published On: Apr 23 2018 2:16PM | Last Updated: Apr 23 2018 3:02PM



मुंबई : प्रतिनिधी

नाणारमध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प होऊ देणार नाही. उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत ही घोषणा केली. तर दुसरीकडे जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करत असल्याची उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी घोषणा केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाणार दौर्‍यावर आहेत. तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत ते नेमकी काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचेच लक्ष होते. नाणारमध्ये होत असलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. भाजपप्रणीत सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेनं, प्रकल्पग्रस्तांच्या भूमिकेला आपला पाठिंबा दर्शवलाय. त्यामुळे नाणार प्रकल्पासंदर्भात उद्योग विभागाने काढलेला अध्यादेश रद्द करून, शिवसेनेने आपली भूमिका कृतीतूनही स्पष्ट करावी अशी अपेक्षा नाणारवासियांनी व्यक्त केली होती. 

मध्यतंरी उद्धव ठाकरे परदेशात असताना केंद्र सरकारने शिवसेनेला अंधारात ठेऊन, सौदी अरेबियातल्या कंपनीबरोबर या प्रकल्पासाठी कराराला मंजुरी दिली. त्यामुळे चिडलेल्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली होती. त्याआधी हा प्रकल्प बळजबरीने राबवण्याचा प्रयत्न झाल्यास आपण मंत्रीपद सोडू अशी भूमिका शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय विधीमंडळ अधिवेशनात घेतली होती.

हे सुभाष देसाई यांचे  वैयक्तिक मत : मुख्यमंत्री

नाणार जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करणे हे सुभाष देसाई यांचे  वैयक्तिक मत आहे. सचिवांची समिती याबाबत अंतिम निर्णय घेईल. (हाय पॉवर कमिटी) आध्यदेश रद्द करण्याचे अधिकार मंत्र्यांना नाहीत. कोकण आणि महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्‍त केले.