Tue, Sep 17, 2019 08:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ...तर २२ ऑगस्टला ठाणे बंद, मनसेचा इशारा

...तर २२ ऑगस्टला ठाणे बंद, मनसेचा इशारा

Published On: Aug 19 2019 3:50PM | Last Updated: Aug 20 2019 1:46AM
ठाणे : प्रतिनिधी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य ईडीच्या चौकशीमुळे मुंबई आणि ठाण्यातील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. २२ ऑगस्टला राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलवल्यास ठाणे बंद करण्याचा इशारा जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. विशेष म्हणजे या मुद्द्यावरून ठाण्यातील मनसैनिक कमालीचे संतप्त झाले असून २२ ऑगस्ट रोजी कायदा सुव्यवस्था बिघडल्यास सरकार जबाबदार असेल, असा इशाराच जाधव यांनी दिला आहे .

ईव्हीएमच्या विरोधात राज ठाकरे यांनी देशभर आंदोलन केल्यामुळेच सरकारकडून हा राजकीय सूड उगवला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी लगावला. संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेष करून ठाण्यात यामुळे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे जाधव यांनी पुढारीशी बोलताना सांगितले. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे  हे गेल्या काही दिवसांपासून ईव्हीएम मशीनच्या विरोधात संपूर्ण देशभर वातावरण तापवण्याचे काम करत आहेत. यासंदर्भात त्यांनी ममता बॅनर्जी यांची देखील भेट घेतली होती. त्यानंतर आता कोहिनूर मिलच्या संदर्भात ईडीची चौकशी लावण्याचे संकेत भाजप सरकारने दिले आहेत. याचे पडसाद मुंबई ठाण्यात उमटायला सुरुवात झाली आहे. 

२२ ऑगस्टला जर राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलावले तर ठाणे बंद करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले आहे. यासंदर्भात कार्यकर्त्यांची बैठक देखील घेण्यात येणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केलं आहे . 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex