होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अन्‍नदात्यासाठी मुंबईकरही झाले अन्‍नदाते

अन्‍नदात्यासाठी मुंबईकरही झाले अन्‍नदाते

Published On: Mar 13 2018 1:47AM | Last Updated: Mar 13 2018 1:46AMमुंबई :  प्रतिनिधी 

आपल्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हजारोंच्या संख्येने मुंबईत धडकलेल्या शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी व त्यांचे मुंबईत स्वागत करण्यासाठी अनेक संस्थांनी आझाद मैदानात धाव घेतली व शक्य ती मदत केली. बळीराजाचा मोर्चा असल्याने विविध पक्ष, स्वयंसेवी संस्थांनी पक्ष, जात, धर्म न पाहता निरपेक्ष भावनेने बळीराजाला सहाय्य करण्याचा निर्णय घेतला व शक्य ती सर्व मदत करण्यात आली. जमैतुल उलेमा ए हिंद या संघटनेतर्फे तसेच अनेक मुस्लिम व शीख संघटनांतर्फे शेतकर्‍यांसाठी पिण्यासाठी पाणी, फळे व बिस्किटांच्या पुड्यांचे व खजुराचे वाटप करण्यात आले. या शेतकर्‍यांना मुंबईत असेपर्यंत जी मदत लागेल ती मदत करण्याची ग्वाही संघटनेतर्फे देण्यात आली. 

शेतकरी हे आमचे बांधव असून त्यांना मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे त्यासाठी आम्ही मैदानात उतरल्याची प्रतिक्रिया जमैतुल उलेमाचे महाराष्ट्र अध्यक्ष हाफिज नदीम सिद्दीकी यांनी दिली. शिवसेनेतर्फे शेतकर्‍यांसाठी प्रथमोपचार केंद्र उभारण्यात आले होते त्याशिवाय सकाळच्या वेळी मोर्चेकर्‍यांना चहा, नाष्टा व पिण्याचे पाणी पुरवण्यात आले होते. डबेवाल्यांच्या संघटनेतर्फे चालवण्यात येणार्‍या रोटी बँक या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकर्‍यांसाठी पावभाजी पुरवण्यात आली तर रात्री जेवण पुरवण्यात आले. गरज भासल्यास आणखी जेवण पुरवण्यात येईल, अशी माहिती सुभाष तळेकर यांनी दिली. शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी वडापावचे वाटप केले. माजी नगरसेवक अवकाश जाधव यांनी चहा व बिस्कीट वाटप केले. शकील पटनी यांच्या लाईफ अ‍ॅन्ड लाईट संस्थेतर्फे 25 हजार लिटर पिण्याचे पाणी वाटण्यात आले. मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश यादव यांच्यातर्फे चहा व नाष्टा वाटप करण्यात आले. 

मोर्चामध्ये  सहभागी  झालेल्या  शेतकर्‍यांची संख्या हजारोंच्या घरात असल्याने सर्वांना जेवण, नाष्टा, पिण्याचे पाणी व इतर सुविधा पुरवणे कोणत्याही एका संस्थेला अशक्य झाले असते त्यामुळे सर्वांनी आपापल्या परीने मदत करण्याची भूमिका घेऊन सहाय्य केल्याने सर्वांची गरज भागू शकली. जगाचा अन्नदाता असलेल्या बळीराजाला मुंबईत आल्यावर अन्न पुरवणे ही आपली जबाबदारी समजून अनेक संस्थांनी व वैयक्तिकरीत्या अनेकांनी शक्य ती मदत केल्याने मुंबईकरांमधील माणुसकीचे पुन्हा एकदा दर्शन या निमित्ताने घडले. 

शेतकर्‍यांसाठी एसटीच्या विशेष 15 गाड्यांची व्यवस्था, दोन खास रेल्वेही सोडल्या

मुंबई : प्रतिनिधी

अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली 6 तारखेपासून सुरु असलेले आंदोलन सरकारशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर मागे घेण्यात आले. मोर्चात सहभागी झालेल्या हजारो शेतकरी, शेतमजुर कष्टकर्‍यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी परिवहन मंडळाने काही विशेष गाड्या सोडल्या. त्याचबरोबर मध्य रेल्वेकडून दोन खास गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती.

आपल्या हक्क व मागण्यांच्या पूर्ततेसाठी 6 मार्चला चालत निघालेला हजारो शेतकर्‍यांचा मोर्चा रविवारी रात्रीच आझाद मैदान येथे पोहचला. त्यांचा परतीचा प्रवास सुकर व्हावा म्हणून एस.टी.ने विविध मार्गांवर खास गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई नाशिक मार्गाने जाण्यासाठी पैसे अधिक लागतात. त्यामुळे बरेच जण सीएसटी ते कसारा रेल्वेचा पर्याय निवडतात आणि तेथून कसारा- नाशिक किंवा शहापूर - नाशिक या मार्गावरून पुढील प्रवास करण्याची शक्यता अधिक आहे, असा अंदाज असल्याचे एस.टी. अधिकारी आर. एच. बांदल यांनी सांगितले. 

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने आझाद मैदान येथून 15 एसटी बसेस सोडण्याची व्यवस्था केली आहे. शिवाय नेहमीच्या वेळापत्रकानुसार कसारा ते नाशिक दरम्यान एकुण 45 गाड्या सोडल्या जातात. शेतकर्‍यांची गर्दी लक्षात घेऊन आणखी 45 गाड्यांची सोय करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी खास चालक, वाहकांची नेमणूक करण्यात आली आहे.

कसारा ते नाशिक किंवा शहापूर ते नाशिक अशी सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच ज्या शेतकर्‍यांना गावात जायचे असल्यास त्यांच्या इच्छित स्थळापर्यंत पोहचविण्यात येणार आहे. बहुतेक सर्व गाड्यांची सोय ठाणे खोपट आगारातून करण्यात आली आहे. एका गावातील 44 शेतकरी धुळे किंवा सांगली या ठिकाणी जाणारे असतील तर त्यांच्या मागणीनुसार गाड्या सोडण्यात येणार आहेत.  सोमवारी तसेच मंगळवारी ही सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.