Wed, Dec 11, 2019 10:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत राज्यातील ३९ शहरांना विविध पुरस्कारांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण(video)

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत राज्यातील ३९ शहरांना विविध पुरस्कारांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण(video)

Published On: Jul 23 2019 7:43PM | Last Updated: Jul 24 2019 1:40AM
मुंबई : सतीश मोरे 

स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या राज्यातील नगरपालिकांना सुमारे 500 कोटी रुपयांची बक्षिसे पुढील वर्षी राज्य शासनामार्फत देण्यात येतील अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केली. तसेच ओडिएफ थ्री स्टार मानांकन होणाऱ्या शहरांना यापुढील काळात प्राधान्याने निधी देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या नगरविकास विभागातर्फे स्वच्छ सर्वेक्षण 2018 व 2019 सालच्या स्पर्धेत देशपातळीवर यश मिळवणाऱ्या महापालिका, नगरपालिकांचा सत्कार मुंबईत करण्यात आला. एकुण 39 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात कराड नगरपालिकेस 2018 मध्ये 25 वा आणि 2019 मध्ये नॉन अमृत शहरांत राष्ट्रीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवल्याबद्दल गौरवण्यात आले. 

सातारा जिल्ह्यातील पाचगणी महाबळेश्वर रहमतपुर कोरेगाव या नगरपालिका नाही स्वच्छ सर्वेक्षण 2018 व 19 मधील यशाबद्दल गौरवण्यात आले. पालिकेचे नगराध्यक्ष मुख्याधिकारी आणि नगरसेवकांनी हा पुरस्कार स्विकारला. कराडच्या नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, जनशक्तीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव, आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे, बांधकाम सभापती हणमंत पवार, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, महिला व बालकल्याण सभापती सौ स्मिता हुलवान तसेच  मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

यावेळी अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटिवार, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, नगर विकास प्रधान सचिव मनिषा म्हैसकर पाटणकर, नगरपरिषद प्रशासन एस मुथ्थु कृष्णन यांची उपस्थिती होती.

पंतप्रधानांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण मध्ये गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रातील शहरानी देशात अव्वल कामगिरी केली आहे. 2020 मध्ये याही पेक्षा चांगली कामगिरी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नगरपालिकांना मिळणाऱ्या निधीशिवाय इतर पाचशे कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले तसेच पुढील वर्षी 3 स्टार मानांकन मिळवणाऱ्या नगरपालिकानाच प्राधान्याने निधी देण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री म्हणाले, 2014 पूर्वी नागरीकरणांकडे शासनाने लक्ष न दिल्याने शहरे बकाल झाली होती. मात्र आमच्या सरकारने नागरीकरण ही संधी म्हणून हे आव्हान स्वीकारले त्यामुळे आज राज्याच्या शहरी भागात चांगले वातावरण निर्माण झाले आहे.  2017 साली महाराष्ट्र हागणदारी मुक्त झाल्याची घोषणा महामहीम राष्ट्रपतीनी केली होती. त्यानंतर सरकारने घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन याला याला प्राधान्य दिले आहे. नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी शासन व नगरपालिका यांच्यात समन्वय साधून चांगली कामगिरी केली आहे.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राज्यात सर्वाधिक घरे निर्माण होत असून आज घडीला राज्यात सुमारे दोनशे शहरांचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित्त झाले आहेत. विविध प्रकारचा निधी देताना कचरा, सांडपाणी यास शासनाने प्राधान्य दिले आहे. केवळ पालिकांना निधी देऊन हे यश मिळाले नसून लोकांच्या सवयी बदलण्यातही यश आल्याने खऱ्या अर्थाने स्वच्छ सर्वेक्षण मध्ये महाराष्ट्राला यश मिळाले आहे. नगरपालिकांच्या पदाधिकाऱ्यांनी केवळ निवडून येऊन नव्हे स्वच्छ सर्वेक्षण मध्ये चांगली कामगिरी करून आपले नेतृत्व सिद्ध केले आहे असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

सलग दोन वर्षे महाराष्ट्र नंबर वन

संपूर्ण देशात महाराष्ट्राने केलेले कामगिरी सर्वोत्तम आहे.सलग दोन वर्षे राज्यअव्वल ठरले आहे . 2018साली महाराष्ट्राने देशपातळीवर  46 पैकी 10 पुरस्कार पटकावले आहेत.  अमृत शहरात शंभर पैकी 28 , नोन अमृत शहरांमध्ये शंभर पैकी 88 शहराने पुरस्कार राज्याने मिळवले होते. 2019 मध्ये केंद्रसरकारच्या 193 पुरस्कारांपैकी 46 पुरस्कार एकट्या महाराष्ट्राने मिळवले आहेत तर तर थ्री स्टार मानांकनात देशात 53 पैकी 27 पुरस्कार मिळवले आहेत.

2020 मध्ये राज्यातील सुमारे दोनशे शहरे 3स्टार मानांकित करण्याचे उद्दिष्ट आहे, असे नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर पाटणकर यांनी सांगितले .पाटणकर यांच्या कामगिरीचे मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या भाषणात कौतुक केले