पीओपी  बंदीचे विघ्न तूर्त टळले

Last Updated: May 23 2020 1:17AM
Responsive image


मुंबई ः पुढारी डेस्क

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदीमुळे यंदाच्या गणेशोत्सवावर आलेले विघ्न अखेर टळले आहे. महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या मागणीचा विचार करून ही बंदी एक वर्ष पुढे ढकलण्यात आल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट केले. अर्थात हा दिलासा वर्षभरासाठीच असून, 2021 पासून मात्र प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी असेल, हे सांगण्यासही जावडेकर विसरले नाहीत. 

गणेशमूर्ती घडवणार्‍या लाखो कारागिरांना मदत म्हणूनच ही बंदी 2021 पर्यंत पुढे ढकलली आहे. ज्यांनी पीओपी मूर्ती आधीच घडवून ठेवल्या त्यांचे आता नुकसान होणार नाही. मात्र 2021 मध्ये ही पीओपी बंदी काटेकोरपणे लागू केली जाईल, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले. गेल्या 13 मे रोजी पीओपी, थर्माकोल आणि एकदाच वापरले जाणारे प्लास्टिकपासून तयार केल्या जाणार्‍या मूर्तींवर देशभरात बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केला होता. या निर्णयाने विशेषत: महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. विशेषत: गणरायाच्या विविध आकारांच्या पीओपी मूर्ती तयार करून बसलेले लाखो कलाकार मोठ्या संकटात सापडले होते.

एकट्या मुंबईत या वर्षी किमान 2.32 लाख छोट्या-मोठ्या मूर्ती विराजमान होणार आहेत. त्यात फक्‍त 15 टक्के मूर्ती या पर्यावरण स्नेही असतील. उर्वरित सर्व मूर्ती पीओपीच्याच असणार आहेत. एकट्या मुंबईची ही स्थिती लक्षात घेतली तर पीओपी बंदीचे संकट संपूर्ण महाराष्ट्रावर कसे आदळणार होते याचा अंदाज येतो. विशेष म्हणजे मुंबई, ठाणे आणि पेणमधील शेकडो कारखान्यांमध्ये तयार झालेल्या आणि साच्यांमध्ये असलेल्या किमान 80 लाख मूर्तींचे काय करायचे असाही प्रश्‍न उभा ठाकला होता. अखेर गणेशभक्‍तांची आणि कारागीरांची प्रार्थना केंद्राने ऐकली आणि आकस्मात जाहीर झालेली पीओपी बंदी पुढील वर्षापर्यंत लांबणीवर पडली.