Sat, May 25, 2019 22:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पत्राचाळ सोसायटी बरखास्त!

पत्राचाळ सोसायटी बरखास्त!

Published On: Dec 14 2017 2:05AM | Last Updated: Dec 14 2017 1:37AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

गोरेगाव येथील सिद्धार्थ नगर अर्थात पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात सुमारे एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणार्‍या विकासक गुरू आशिष कन्ट्रक्शनच्या विरोधात म्हाडाने कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात म्हाडाने केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत गृहनिर्माण सहकार उपनिबंधक यांनी पुनर्विकास प्रकल्पातील घोटाळेबाजांना साथ देणार्‍या पदाधिकार्‍यांची सोसायटीच बरखास्त करत प्रशासकाची नियुक्ती केली आहे. 

पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प राबविणार्‍या विकासकाने प्रकल्पाचे काम रखवडले. त्याचबरोबर पत्राचाळ सहकारी गृहनिर्माण संस्थेने आपल्या कर्तव्यात कसूर केली आहे. गृहनिर्माण सोसायटीच्या संचालकांनी बर्‍याच ठिकाणी नियमांचे उल्लंघन केले असून सोसायटीचे कामकाज चालविण्यास पदाधिकारी अकार्यक्षम असल्याचा ठपका उपनिबंधकानी  ठेवला आहे. नवीन संचालक मंडळाची निवड होईपर्यंत दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी उपनिबंधक कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी डी. आर. पाटील यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

यासंदर्भात डी. आर. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ‘उपनिबंधकांनी सोसायटी बरखास्त करण्याचे आदेश 8 डिसेंबरच्या पत्रानुसार आपल्याला दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार पत्राचाळ गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांची बैठक घेण्यात येईल. त्यात नव्या संचालक मंडळाची नियुक्ती केली जाईल’, असे सांगितले. ज्या ठिकाणी यापूर्वीच्या पदाधिकार्‍यांनी चुका केल्या असतील त्या दुरुस्त केल्या जातील. या प्रकरणात दोषी असणार्‍यांवर म्हाडा त्यांच्या नियमानुसार कारवाई करेल असे, त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांच्याशी संपर्क साधला असता, आपण हिवाळी अधिवेशनाच्या कामात नागपूर येथे व्यस्त आहोत’, असे त्यांनी सांगितले.