Sat, Jul 20, 2019 23:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दर कमी दिल्यास दूध संघ बरखास्त

दर कमी दिल्यास दूध संघ बरखास्त

Published On: May 04 2018 7:20AM | Last Updated: May 04 2018 2:00AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्यात सध्या सुरू असलेल्या मोफत दूध वाटप आंदोलनाची सरकारने गंभीर दखल घेतली असून, शेतकर्‍यांना राज्य सरकारने ठरविलेला दुधाचा दर न दिल्यास संबंधित दूध संघांवर बरखास्तीची कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तर उसाप्रमाणे आता दुधालाही सबसिडी देण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिली.

सरकारने जाहीर केल्याप्रमाणे दुधाला प्रतिलिटर किमान 27 रुपयांऐवजी केवळ 18 ते 20 रुपये दर सहकारी दूध संघाकडून दिला जात आहे. याविरोधात लुटता कशाला, फुकटच न्या, असे म्हणत शेतकर्‍यांनी मोफत दूध वाटप आंदोलन सुरू केले आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोलन सुरू आहे. राज्यभर चौकाचौकांत मोफत दूध वाटप सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. संघांकडून शेतकर्‍यांची होणारी लूट विचारात घेऊन मुख्यमंत्र्यांनी हा इशारा दिला आहे. दुग्धविकास मंत्री महादेव जानकर आणि मुख्य सचिवांबरोबर झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, सरकारने गायीच्या दुधासाठी 27 रुपये प्रतिलिटर दर दिला आहे. मात्र, हा दर दूध संघांकडून दिला जात नसल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत. राज्याचा दुधाचा एक ब्रँडसाठी सरकार आग्रही आहे. दुग्धविकास मंत्री जानकर यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात साखर आणि दूध पावडरचे दर कोसळल्याचा परिणाम  दुधाच्या दरावर होत असल्याचे सांगितले.

दूध संघांना राज्य सरकारकडून नोटिसा

दूध उत्पादक शेतकर्‍यांना योग्य दर देण्याच्या नोटिसा राज्य सरकारने दूध संघांना पाठवल्या आहेत. 27 रुपयांऐवजी केवळ 18 ते 20 रुपये देत असलेल्या संघांची माहिती सरकारने मागविली आहे. येत्या सहा ते सात दिवसांत त्यांच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे. दूध उत्पादकांना हमीभाव देण्यासंदर्भात राज्य सरकार कायदा करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Tags : Mumbai, Dismissal,  Milk, Union, reduced rate