होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नाणारची अधिसूचना रद्द करा

नाणारची अधिसूचना रद्द करा

Published On: Jun 06 2018 2:09AM | Last Updated: Jun 06 2018 12:55AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी काढण्यात आलेली अधिसूचना रद्द करण्याचा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिलेला प्रस्ताव तत्काळ मंजूर करावा व हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. हा प्रकल्प लादल्यास नाणार येथील परिस्थिती चिघळण्याची भीतीही शिवसेनेच्या मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. 
नाणार प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला असला तरी स्थानिक जनतेशी चर्चा करुन प्रकल्प उभारण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. त्यामुळे या प्रकल्पावरुन भाजप ˆ शिवसेनेत वाद निर्माण झाला आहे. सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्याशी चर्चा न करता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अधिसूचना रद्द करुन तसा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविला आहे. मात्र, या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यावर शिवसेना मंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेत हा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची लेखी मागणी मंगळवारी केली. 

स्थानिक जनतेचा नाणार प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. सर्व ग्रामपंचायतींनी प्रकल्पाच्या विरोधात ठराव दिले आहेत. भूसंपादन प्रक्रिया ठप्प झाली आहे. स्थानिक जनतेला प्रकल्प लादणार नसल्याचे आश्‍वासन देण्यात आलेले आहे. या पार्श्‍वभूमीवर सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यासाठी काढलेली अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी उद्योग सचिवांना दिल्या आहेत. त्यावर असा प्रस्ताव तयार करण्याची अनुमती मिळावी म्हणून उद्योग सचिवांनी मुख्यमंत्र्यांकडे फाईल पाठविली आहे. 
या प्रस्तावाला तत्काळ परवानगी द्यावी, असे पत्र सुभाष देसाई यांच्यासह परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले.