Tue, Mar 19, 2019 09:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विषबाधा झालेल्या कैद्यांना जेजेतून डिस्चार्ज

विषबाधा झालेल्या कैद्यांना जेजेतून डिस्चार्ज

Published On: Jul 22 2018 1:00AM | Last Updated: Jul 22 2018 12:54AMमुंबई : प्रतिनिधी

शुक्रवारी भायखळा जेलमधील 87 कैद्यांना त्रास झाल्याने त्यांच्यावर जे.जे रुग्णालयत उपचार सुरू होते. त्यापैकी 79 महिला कैद्यांना शनिवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर आठ रुग्णांवर अजून काही दिवस रुग्णालयात उपचार सुरू राहणार आहेत.तब्बल 40 डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केल्यानंतर शनिवारी सायंकाळी त्यांना आराम वाटू लागल्याने जेल प्रशासनाला माहिती देऊन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचे प्रभारी अधिष्ठाता मुकुंद तायडे यांनी सांगितले. 

शुक्रवारी रुग्णालयात 87 रुग्ण दाखल झाले होते. या रुग्णांना उलट्या आणि डिहायड्रेशनचा त्रास होत होता. पण आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यामुळे 79 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आठ रुग्णांवर आणखी काही दिवस उपचार सुरू राहतील. यामध्ये सात महिला (त्यापैकी तीन गरोदर) आणि एक पुरुष यांचा समावेश आहे, अशी माहिती मेडिसिन विभागाचे डॉ. अनिश व्ही. यांनी दिली.

रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विलास कुर्डे म्हणाले की, या सात महिलांपैकी काही महिला 22 ते 24 आठवड्याच्या गरोदर आहेत. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. या महिलांना 48 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. यातील एका महिलेला अ‍ॅनिमिया असल्याने तिची विशेष काळजी घेतली जात आहे.

रुग्णालयात उपचार सुरू असणार्‍या रुग्णांना अजून डिहायड्रेशनचा त्रास जाणवत असल्याने रुग्ण बरेे होईपर्यंत त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात येईल. एफडीएच्या अन्न विभागाने पोहे, तांदूळ, गहू, अख्खे मसूर आणि खाद्यतेल असे पाच अन्नपदार्थांचे नमुने घेतले आहेत. हे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले असून तपासणी अहवाल येण्यासाठी अजून दोन तीन लागणार असल्याची माहिती शैलेश आढाव, सहआयुक्त, अन्न (बृहन्मुंबई), एफडीए यांनी दिली आहे.