Wed, Jul 08, 2020 05:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘सीएए’वरून आघाडीत धुसफुस?

‘सीएए’वरून आघाडीत धुसफुस?

Last Updated: Feb 23 2020 2:15AM
मुंबई : उदय तानपाठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांत घेतलेल्या भूमिकांमुळे काँग्रेेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये अस्वस्थता असून, शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. 

उद्यापासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून, विरोधकांच्या हल्ल्यास प्रत्युत्तर देण्याच्या रणनीतीवर यावेळी चर्चा झाली. दिल्लीत पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी ‘सीएए’ला पाठिंबा असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. ‘सीएए’ला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा सक्त विरोध असून, देशभर आंदोलने सुरू आहेत. या विधेयकाला लोकसभेत शिवसेनेने पाठिंबा दिला होता; मात्र राज्यसभेत विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर विधिमंडळात भाजपकडून शिवसेनेला खिंडीत गाठण्यासाठी एखादा ठराव येऊ शकतो. तसा तो आला, तर कोणती भूमिका घ्यायची, याबद्दल शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.

एल्गार परिषद प्रकरणाचा तपास राष्ट्रवादीचा विरोध डावलून ‘एनआयए’कडे सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्यानंतर शरद पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली होती. राज्य सरकारची ‘एसआयटी’ नेमून या प्रकरणाचा स्वतंत्र तपास करण्याचा विचार राष्ट्रवादीत सुरू आहे. यावरदेखील शरद पवार यांनी आपली भूमिका मांडल्याचे सांगण्यात आले. दुपारी चारच्या सुमारास सुरू झालेली ही बैठक दीड तास चालली. शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत हे यावेळी उपस्थित होते.

शरद पवार यांनी ‘सीएए’सह या नव्या कायद्यातील काही धोके मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले. तेव्हा त्यातील आक्षेपार्ह बाबी केंद्र सरकारला कळविण्याचे बैठकीत ठरले. तिन्ही पक्षांचे काही मंत्री एकत्रितपणे या कायद्यातील त्रुटींवर विचार करून त्याबाबतचा अहवाल सादर करतील, असेही बैठकीत ठरल्याचे कळते.

ठाकरेंना ‘सीएए’चे धोके समजावून सांगावे लागतील : काँग्रेस
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राष्टीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) हे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचे (एनआरसी) मूळ आहे. हे दोन्ही नवे कायदे परस्परांशी निगडीत आहेत. एकदा तुम्ही एनपीआरला मान्यता दिली की त्यानंतर तुम्ही एनआरसीला रोखू शकत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव  ठाकरे यांनी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याची (सीएए) भीती बाळगू नये असे म्हटले असले तरी त्यांना हे नवे कायदे समजावून सांगावे लागतील तरच त्याचे परिणाम त्यांच्या लक्षात येतील असे  काँग्रेसचे नेते मनिष तिवारी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

नागरिकत्व सुधारणा कायदा 2003 समजावून घेतला तर त्यांना एनपीआर आणि एनआरसीचे धोके समजून येतील,  असे तिवारी म्हणाले.ठाकरे यांच्या सीएएसंबंधीच्या वक्तव्यावरील काँग्रेस नेते तिवारी यांची प्रतिक्रिया म्हणजे अप्रत्यक्ष ठाकरे यांच्यावर टीका असल्याचे समजले जात आहे.

उद्धव योग्य मार्गावर; परीक्षेची वेळ आलेली नाही ः शरद पवार
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
उध्दव ठाकरे हे योग्य मार्गाने वाटचाल करीत असले, तरी अजून त्यांच्या परिक्षेची वेळच आलेली नसल्याने त्यांना किती गुण द्यावेत हे सांगता येणार नाही, असे सांगत ठाकरे सरकारचा रिमोट कंट्रोल आपल्या हाती नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

एका  वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात पवार म्हणाले, विचारल्याखेरीज आपण सल्लाही देत नाही, सगळे काही सुरळीत चालू लागल्यानंतरच आपण बाजूला झालो. आमच्यात कोणतीही कटुता नाही, ज्यांच्या हाती सरकारचे नेतृत्व आहे ते सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे आहेत आणि ते दुसर्‍यांच्या कामात मुळीच हस्तक्षेप करत नाहीत, अशा शब्दांत पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे कौतुक केले. काँग्रेसचे निर्णय दिल्लीत होत असल्याची परंपरा असली, तरी आता त्यांनीही निर्णय घेण्याच्या पद्धतीत बदल केला असून सहकार्याने सरकार टिकवायचे या भूमिकेत काँग्रेस असल्याचे दिसत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.