Thu, Jun 20, 2019 06:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नक्षलवाद्यांनो, आता गुमान शरण या

नक्षलवाद्यांनो, आता गुमान शरण या

Published On: Apr 24 2018 2:03AM | Last Updated: Apr 24 2018 12:38AMमुंबई : प्रतिनिधी

गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात लपून बसलेल्या 16 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्याची महत्त्वपूर्ण कारवाई गडचिरोली पोलिसांनी केली आहे. या कारवाईने नक्षलवाद्यांसमोर शरणागती पत्करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नसून त्यांनी शरणागती पत्करुन लोकशाहीचा मार्ग अवलंबण्याचे आवाहन पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी सोमवारी केले. ते पोलीस मुख्यालयात आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते. 

मूळच्या आंध्रप्रदेशच्या वरंगल, छल्लाग्रिगमधील रहिवाशी असलेला श्रीनु उर्फ श्रीकांत ऊर्फ रावतु विजेंद्र (50) हा सुरुवातीच्या काळात आंध्रप्रदेशात कार्यरत होता. 2003 साली तो गडचिरोलीत दाखल झाला. गडचिरोलीमध्ये नक्षली कारवाया करताना तो येथील डिव्हीजनचा सचिव झाला. त्याच्याविरोधात तब्बल 82 गुन्हे दाखल असून शासनाने 20 लाखांचे इनाम त्याच्यावर ठेवले होते. श्रीनु याच्यासह पेरमिली दलम डिव्हीसीचा मोस्टवॉन्टेड नक्षली असलेल्या साईनाथ उर्फ डोलेश मादी आत्राम (32) याच्याविरोधात 75 गुन्हे दाखल असून त्याच्यावर 16 लाखांचे इनाम होते. या दोघांसह माओवाद्यांचा एक कॅम्प भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात इंदिरा नदिकाठी वास्तव्यास असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार रविवारी पहाटेच्यावेळी गडचिरोली पोलिसांच्या 60 जवानांच्या पथकाने या ठिकाणी घुसून कारवाई करण्यास सुरुवात केली. सुमारे दीड तास झालेल्या चकमकीत 16 माओवादी मारले गेले. यातील 11 जणांची ओळख पटविण्यात यश आले आहे. त्यांच्याजवळून रायफल, एसएलआर, एके 47, 12 आणि 8 बोअरची पिस्तूल असा मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. या माओवाद्यांची गेल्या काही वर्षांतील कामगिरी थंडावली होती. मात्र जलद आणि कमी वेळात छोट्या छोट्या कारवाया करुन राज्याच्या सीमा भागात अ‍ॅक्टीव होते, असेही माथुर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. 

राज्यातील आजवरची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. सध्या अप्पर पोलीस अधिक्षक दर्जाचा अधिकारीही तीन ते चार दिवस जंगलात राहून पथकांचे नेतृत्व करत आहे. मात्र काही वर्षांपूर्वी अशी परिस्थीती नव्हती. पोलिसांच्या गाड्यांना नक्षलवादी सहज टार्गेट करत होते. मात्र पोलीस जवान आता स्वतःच्या हिमतीवर पायी गस्त घालत आहेत. 

माओवाद्यांना पुरविण्यात येणारे 307 कोटी जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांच्या कारवाईमुळे नक्षलवाद्यांचे खच्चीकरण झाले असून त्यांच्याच माणसांमध्ये फुट पडली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये 43 माओवाद्यांचा खात्मा करण्यात पोलीस जवानांना यश आले आहे. तर तब्बल 605 माओवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. शरणागती पत्करलेल्यांवर शासनाने 7 कोटी रुपये खर्च केले असून अनेक चांगल्या योजना राबवत आहे. या योजनांचा लाभ घेऊन माओवाद्यांनी शरणागती पत्करुन लोकशाहीचा मार्ग अवलंबावा, उगाच पोलिसांशी दोन हात करु नये. आता हार त्यांची होणार आहे, असे मत माथूर यांनी व्यक्त केले.

Tags : Mumbai, Director General of Police, appeal, Mumbai news,