Thu, Jun 27, 2019 18:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ८०० पोलिसांना मिळणार १ मे रोजी महासंचालक पदक

८०० पोलिसांना मिळणार १ मे रोजी महासंचालक पदक

Published On: Dec 07 2017 2:06AM | Last Updated: Dec 07 2017 1:23AM

बुकमार्क करा

नवी मुंबई : राजेंद्र पाटील 

राज्य पोलीस दलातील प्रशंसनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 1 मे रोजी पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र अधिकारी व कर्मचार्‍यांना दिले जाते. दरवर्षी 800 पात्र पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांची यासाठी निवड केली जाते. त्यासाठी पोलीस अधीक्षक, आयुक्त आणि विशेष पोलीस महासंचालकांकडून छाननी करुन सन्मानचिन्हास पात्र असणार्‍या अधिकार्‍यांचा अहवाल, शिफारशी 31 डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी बुधवारी दिले.

दरवर्षी पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह हे राज्य पोलीस दलातील पोलीस आयुक्तालये, अधीक्षक कार्यालये, गुन्हे अन्वेषण विभाग, बिनतारी संदेश विभाग, प्रशिक्षण व खास पथके, एसआरपीएफ, वाहतूक, महामार्ग, लोहमार्ग आणि दहशतवादविरोधी पथकातील गुणवत्ता धारक कर्मचारी व अधिकार्‍यांना दिले जाते. यामध्ये 800 सन्मानचिन्हांपैकी 20 टक्के म्हणजेच 160 सन्मानचिन्हे चकमकीमध्ये जखमी झालेल्या, अतिरेक्यांविरुध्द व नक्षलवाद्यांविरुध्द केलेल्या कारवाईमध्ये सामील झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी राखीव ठेवली जातात. 

पोलीस महासंचालक पदकासाठी अर्ज करणार्‍या कर्मचारी व अधिकार्‍यांना लागोपाठ तीन वेळा राज्य सरकारने शिफारस केल्यानंतरही राष्ट्रपती पोलीस पदक, पोलीस पदक प्रदान करण्यात आलेले नसल्यास अशा कर्मचार्‍यांना दिले जाते.शिवाय पोलीस महासंचालक पदक मिळण्यापूर्वी राष्ट्रपती पदक मिळालेल्या कर्मचार्‍यांनाही डीजी पदक प्रदान केले जाणार आहे. याव्यतिरिक्त दरोडेखोर, गुन्हेगारांच्या टोळ्या, अघोर व तंत्रबध्द गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांवर कारवाई केली असल्यास, सनसनाटी व कठीण गुन्ह्यांचा यशस्वीपणे शोध  लावणे, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतकार्य, पोलिसांची प्रतिमा उजळ करणे, राष्ट्रीय स्तरावर खेळात प्रावीण्य, पोलिसांच्या कामात सुधारणा करण्यासाठी केलेल्या सूचना, कमीत कमी 100 बक्षिसे पात्रधारक, सेवापुस्तिकेत पाच शेरे अतिउत्कृष्ट, 10 वर्षात एकही शेरा बी नसावा अशा कर्मचार्‍यांची निवड केली जाणार आहे.