Sun, May 26, 2019 10:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विदेशी जहाजातील डिझेल चोरी करणारी टोळी गजाआड

विदेशी जहाजातील डिझेल चोरी करणारी टोळी गजाआड

Published On: May 19 2018 1:33AM | Last Updated: May 19 2018 1:07AMमुंबई : प्रतिनिधी

विदेशी जहाजातून डिझेल चोरी करणार्‍या एका टोळीचा येलोगेट पोलिसांनी पर्दाफाश केला असून याच टोळीशी संबंधित सातजणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी एक बार्ज, अकरा लाख रुपयांचे डिझेल आणि इतर साहित्य जप्त केले आहे. या सातही आरोपींना येथील लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या सातजणांमध्ये रामबाबू शत्रुघ्न ठाकूर, काशिनाथ शिवनाथ दास, मोहम्मद हर्षद अब्दुल, मनोज ऋषी, अकबर पिंजारा, मोहम्मद अली पुजंलकटी, ललितकुमार यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

समुद्रात डिझेल चोरी करणार्‍या अनेक टोळ्या कार्यरत असून यातील काही टोळ्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता. तरीही डिझेल चोरीच्या घटना घडत होत्या. अशा आरोपींविरुद्ध येलोगेट पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली होती. समुद्रात सतत गस्त घालून पोलीस अशा टोळ्यांचा शोध घेत आहेत. 14 मे रोजी येलोगेट पोलिसांचे एक विशेष पथक समुद्रात गस्त घालत होते. यावेळी एका बार्जजवळ काहीतरी संशयास्पद हालचाली सुरु असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आलेे. त्यानंतर पोलिसांनी तिथे जाऊन पाहणी केली असता तिथे डिझेल चोरी सुरु असल्याचे उघडकीस आले. डिझेल एका बार्जमध्ये पाईपच्या सहाय्याने लपवून ठेवण्यात आले होते. चौकशीत या टोळीने डिझेल डॉल्फिन आणि टॅग फाईव्ह या विदेशी जहाजातून चोरी केल्याची कबुली दिली. 

त्यानंतर बार्जचा मालक अकबर पिंजारा, मोहम्मदअली आणि ललितकुमारला पोलिसांनी चाौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीतून डिझेल चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांच्या इतर चार साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्वांविरुद्ध  चोरीसह जीवनाश्यक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी बार्जसह अकरा लाख रुपयांचे 40 हजार लिटर डिझेलचा साठा जप्त केला आहे.