Mon, May 27, 2019 08:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरेगाव-भीमा घटनेला सरकारची स्पॉन्सरशिप ? : धनंजय मुंडे

कोरेगाव-भीमा घटनेला सरकारची स्पॉन्सरशिप ? : धनंजय मुंडे 

Published On: Feb 28 2018 2:22PM | Last Updated: Feb 28 2018 2:00PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

कोरेगाव-भीमा पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. या परिसरात काही संघटनांनी वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता. याची माहिती स्थानिक पोलिसांना होती. तरीही जाणीवपूर्वक १ तारखेला पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवला नाही. दंगल होऊ दिली. हे ज्यांच्यामुळे घडले त्यांना सरकार अटक करत नाही, अशी टीका आज  धनंजय मुंडे यांनी केली.

सरकार त्या दोन व्यक्तींसमोर किती हतबल झाले आहे? हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. यामुळे भीमा-कोरेगावच्या घटनेला सरकारची स्पॉन्सरशिप होती का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या घटनेनंतर लोकांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला. यावेळी राज्यभर कोबिंग ऑपरेशन राबवले गेले. औरंगाबाद येथे एका निष्पाप गरोदर महिलेवर स्वतः सीपींनी कारवाई करत अत्याचार केल्याची माहिती मिळाली आहे, असेही ते म्हणाले. 

कोरेगाव-भीमा प्रकरण  गंभीर असून यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अॅड. जयदेव गायकवाड यांनी विधान परिषदेत २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडून सरकारतर्फे ठोस उत्तर मिळावे, अशी मागणी केली. मात्र प्रश्नोत्तरच्या तासातच या प्रश्नाचा निकाल लावावा, हे सरकारमधील सदस्य सांगत असून हे अतिशय दुःखदायक असल्याचे राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांनी म्हटले आहे. 

मिलिंद एकबोटे व मनोहर भिडे यांनी जाणीवपूर्वक कटकारस्थान करत दंगल भडकवली. पोलिसांनी १ जानेवारीला बघ्याची भूमिका घेतली होती. उलट जे भाविक तेथे आले होते त्यातील ५४ हजार लोकांवर पोलिसांनी केसेसे दाखल केल्या. सरकारने एकबोटे व भिडे यांना लवकरात लवकर अटक करत निष्पाप लोकांवर ज्या केसेस दाखल झाल्यात त्या मागे घ्याव्या, असे राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण म्हणाल्या.