होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धुळे घटनेला सरकार, पोलीस जबाबदार

धुळे घटनेला सरकार, पोलीस जबाबदार

Published On: Jul 03 2018 2:25AM | Last Updated: Jul 03 2018 2:25AMमुंबई : प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात घडलेल्या घटनेस राज्य सरकार व पोलीस प्रशासनाची निष्क्रियता जबाबदार आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णतः ढासळली असून महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे, की जंगलराज ? असा प्रश्‍न जनतेसमोर उभा असल्याची टीका काँग्रेस प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मुले चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरून जमावाने पाच जणांची ठेचून हत्या केल्याची घटना अत्यंत धक्कादायक आणि दुर्र्दैेवी आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागातून अशा घटना समोर येत आहेत त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करण्यात मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारितील गृहखाते अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांचे गृहखात्यावर नियंत्रण राहिले नसल्याचे यातून स्पष्ट होत असल्याची टीका चव्हाण यांनी केली.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मुले पळवून नेणार्‍या टोळीबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. या अफवांमुळे राज्याच्या विविध भागात यापूर्वीही जमावाकडून मारहाणीच्या घटना झाल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात जमावाकडून झालेल्या अशाच एका मारहाणीत दोन लोकांचा मृत्यू झाला. राज्याच्या विविध भागातून रोज जमावाने मुले पळवणारे समजून लोकांना मारहाण केल्याच्या घटना समोर येत आहेत. पण सरकार आणि पोलीस प्रशासनाने सोशल मीडियावरील अफवा आणि मारहाणीच्या घटना रोखण्यासाठी काहीच प्रतिबंधात्मक उपाययोजना केली नसल्याने अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे ते म्हणाले. 

जळगावमध्ये अशाच एका घटनेत भाजपा आमदाराने लोकांचा जमाव सोबत घेऊन मुले पळविणार्‍या टोळीचे सदस्य असल्याच्या संशयावरून बहुरुप्यांना जबर मारहाण केली होती. पण पोलिसांनी त्या भाजप आमदारावर काहीच कारवाई केली नाही. त्यानंतर राज्यभरात अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सरकारने अशा प्रकारच्या अफवा पसरवणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.