Wed, Aug 21, 2019 02:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्य सरकारचे चित्रपट पुरस्‍कार जाहीर; धर्मेंद्र यांना राज कपूर जीवनगौरव

राज्य सरकारचे चित्रपट पुरस्‍कार जाहीर; धर्मेंद्र यांना राज कपूर जीवनगौरव

Published On: Apr 15 2018 12:47PM | Last Updated: Apr 15 2018 12:47PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

राज्य शासनाच्यावतीने दिला जाणारा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद व राजकपूर विशेष योगदान पुरस्कार प्रसिध्द दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना जाहीर झाला. तर चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रसिध्द अभिनेते विजय चव्हाण आणि चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रसिध्द अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांना घोषित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज येथे या पुरस्काराची घोषणा केली.

मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतित केले आहे. तसेच चित्रपट सृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अशा ज्येष्ठ व्यक्तीला चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव व चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार तसेच राजकपूर जीवनगौरव व राजकपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. जीवनगौरव पुरस्कार  ५ लाख रुपये रोख व मानपत्र तर विशेष योगदान पुरस्कार ३ लाख रुपये आणि मानपत्र अशा स्‍वरुपाचा आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कारासाठी सदस्य असलेल्या दिलीप प्रभावळकर, श्रावणी देवधर, श्याम भूतकर तर राजकपूर पुरस्कारासाठी सदस्य असलेल्या नाना पाटेकर, समीर(गीतकार), सुरेश ऑबेराय आदींच्या समितीने या मान्यवरांची सन २०१८ च्या पुरस्कारांसाठी निवड केली.

विजय चव्‍हाण यांना चित्रपती व्‍ही. शांताराम पुरस्‍कार

गेली ४ दशकं आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारे हरहुन्नरी कलावंत म्हणजे विजय चव्हाण. विजय चव्हाण हे मराठी चित्रपटसृष्टीत सहाय्यक कलाकार म्हणून आले. ज्या काळी मराठीतच काय, हिंदी चित्रपटसृष्टीतही सहाय्यक कलाकाराला योग्य स्थान मिळाले नव्हते. तेव्हा विजय चव्हाण यांनी हा सहाय्यक कलाकार मोठा केला. त्यांनी कधीच कोणत्याही भूमिकेत भेदभाव केला नाही. विजय चव्हाण यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने गेल्या अनेक वर्षापासून मराठी चित्रपटसृष्टी गाजविली आहे. त्यांच्या चित्रपट, नाटकातील अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत, जत्रा, घोळात घोळ, आली लहर केला कहर, माहेरची साडी, येऊ का घरात यांसारख्या अनेक चित्रपटांत त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. त्यांच्या कामाची रसिकांनीही प्रशंसा केली.

मोरुची मावशी हे विजय चव्हाण यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेले नाटक. या नाटकात त्यांनी मोरुची मावशी अप्रतिम रंगवली. हे नाटक त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामुळे मिळाले होते. या नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास घडविला. मग मात्र, चव्हाण यांची मालिका आणि चित्रपट यामधून यशस्वी घोडदौड सुरु झाली.

मृणाल कुलकर्णी यांना चित्रपती व्‍ही. शांताराम विशेष योगदान पुरस्‍कार

मृणाल कुलकर्णी यांनी मराठी-हिंदी चित्रपट, नाटक, टेलिव्हिजन या तिन्ही क्षेत्रात काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. रमा माधव या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनातून त्यांनी दिग्दर्शिका म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. शिक्षण घेत असताना स्वामी या मालिकेतून मृणाल कुलकर्णी यांनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. राजवाडे अँड सन्स, कशाला उद्याची बात, यल्लो या मराठी चित्रपटांमध्ये मृणाल यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यासोबत आशिक, राम गोपाल वर्मा की आग, रास्ता रोको, छोडो कल की बातें, मेड इन चायना या हिंदी चित्रपटांमधूनही अभिनयाव्दारे मृणाल कुलकर्णी ह्या झळकलेल्या आहेत.  राजा शिवछत्रपती, मीरा, स्पर्श, गुंतता ह्दय हे, अवंतिका या टीव्ही मालिकांव्दारेही त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केले आहे.

धमेंद्रला राज कपूर जीवनगौरव

१९६० ते १९८० या दशकात रुपेरी पडदा गाजवणारा हिमॅन अभिनेता म्हणजे धर्मेद्र. १९६० साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेल्या धर्मेद्र यांनी आता पर्यंत सुमारे २५० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 'दिल भी तेरा, हम भी तेरे' या चित्रपटाने त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. १९७६ ते १९८४ च्या काळात त्यांनी अनेक ॲक्शनपट केले. बिमल रॉय, जे पी दत्ता, मोहन कुमार, दुलाल गुहा, राजकुमार कोहली, राज खोसला, रमेश सिप्पी अशा अनेक दिग्दर्शकांसह त्यांनी काम केले आहे. फूल और पत्थर चित्रपटांत त्यांनी मीना कुमारींसह काम केले.

मीना कुमारी, माला सिन्हा, सायरा बानू, शर्मिला टागोर, आशा पारेख, परवीन बाबी, हेमा मालिनी, रीना रॉय, जया प्रदा या मोठ्या अभिनेत्रींसह त्यांनी काम केले आहे.  जुगनू, ललकार, ब्लॅकमेल, यादों की बारात या चित्रपटांमुळे ते ॲक्शन हिरो म्हणून नावजले जाऊ लागले. हेमा मालिनींसोबतची त्यांची जोडी नेहमीच हिट राहिली. धर्मेंद्र यांनी आपल्या मुलांसाठी चित्रपटांची निर्मितीही केली. सनी देओलने बेताब तर बॉबीने बरसात चित्रपटाव्दारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. शोले चित्रपटात त्यांनी साकारलेली विरुची भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहे. २०१२ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

राजकुमार हिराणींना राज कपूर विशेष योगदान पुरस्‍कार

राजकुमार हिराणी यांचा जन्म १९६२ साली नागपूर येथे झाला असून चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व लेखक अशी त्यांची ओळख आहे. विधू विनोद चोप्रा यांचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी चित्रपट दिग्दर्शनाला सुरवात केली. त्यांनी स्वत: प्रमुख दिग्दर्शक म्हणून मुन्नाभाई एम.बी.बी.एस या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटास राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनंतर राजकुमार हिराणी यांनी लगे रहो मुन्ना भाई व ३ इडियटस ह्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. हे तिन्ही चित्रपट सुपरहिट झाले. राजकुमार हिरानी यांना आजवर फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक सिने-पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या वतीने होणा-या यंदाच्या ५५ व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात या राजकपूर जीवनगौरव व चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. 

Tags : Dharmendra, vijay chavan, chitrapati V shantaram Lifetime Achievement Award, Raj Kapoor Lifetime Achievement Award, mrunal kulkarni, rajkumar hirani