Thu, Apr 25, 2019 03:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धारावीत चिमुरड्याची गळफासाने आत्महत्या ?

धारावीत चिमुरड्याची गळफासाने आत्महत्या ?

Published On: Feb 26 2018 1:16AM | Last Updated: Feb 26 2018 1:14AMधारावी : प्रतिनिधी 

सायनच्या डी. एस. हायस्कूलमध्ये चौथीच्या वर्गात शिकणार्‍या 10 वर्षीय चिमुरड्याचा मृतदेह ओढणीने गळफास घेतल्याच्या अवस्थेत शनिवारी रात्री सापडल्याची घटना धारावीतील इंदिरा कुरेशी नगरातील लक्ष्मी चाळीत घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली असून  चिमुरड्याच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. 

अभिजीत उर्फ बबलू शिवकुमार बारस्कर असे या चिमुरड्याचे नाव आहे. घटनेवेळी चिमुरड्याव्यतिरिक्त घरात कोणी नव्हते. त्याने माळ्याच्या शिडीची झडप बंद केली आणि घरातील सोफ्यावर चढून छपराच्या लोखंडी पाईपला ओढणी बांधली आणि गळफास घेतला, असे धारावी पोलिसांचे म्हणणे आहे. गेल्या दोन दिवसांपासून अभिजित आपल्या मोठ्या बहिणीसह पीएमजीपी कॉलनीत राहणार्‍या आजीकडे राहायला गेला होता. घर साफसफाईला काढल्याने शनिवारी सायंकाळी आजीने भावंडांना इमारतीखाली खेळायला जाण्यास सांगितले असता या भावंडांनी तात्काळ आपले  घर गाठले.

त्यावेळी आई वडील कामावर असल्याने घरात कोणीच नव्हते. ते पाहून अभिजीतच्या बहिणीने पुन्हा आजीकडे जाण्याचा निर्णय घेतला व अभिजीतला सोबत येण्याचा आग्रह धरला. परंतु अभिजीतने झोप आल्याचे कारण सांगत तिच्यासोबत येणे टाळले. अभिजीतने आपल्या आईला फोन करून आजीकडे आपण सोबत जेवायला जाऊ, असे सांगितले होते. रात्री आई कामावरून आली असता शिडीच्या झडपाला बाहेरून कडी नसल्याचे तिच्या निदर्शनास आले. तिने झडप उघडली असता छताला लटकलेल्या अभिजीतला पाहून तिने हंबरडा फोडला. 

अभिजीतला तात्काळ शिव रुग्णालयात दाखल केले. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. चिमुरड्याचा मृत्यू संशयास्पद असल्याच्या चर्चेला परिसरात उधाण आल्याने शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे धारावी पोलिसांनी सांगितले.