Sun, Nov 18, 2018 21:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धारावी पुनर्विकास प्रकल्प रेंगाळला! 

धारावी पुनर्विकास प्रकल्प रेंगाळला! 

Published On: Mar 04 2018 2:09AM | Last Updated: Mar 04 2018 2:09AMमुंबई : प्रतिनिधी 

धारावीचा पुनर्विकास प्रकल्प गेल्या तेरा वर्षांपासून अद्याप रखडलेलाच आहे. धारावीचा पुनर्विकास करण्यासाठी सरकारने धारावी पुनर्विकास प्राधिकरणाची (डीआरपी) स्थापना केली आहे. सरकारकडून ठोस निर्णय होत नसल्याने पुनर्विकासामध्ये अडथळा निर्माण झाला आहे. 

धारावीचा पुनर्विकास -5 सेक्टरमध्ये करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार सेक्टर-5 चे काम म्हाडाकडे सोपवण्यात आले आहे. तर उर्वरित 1 ते 4 सेक्टरचे काम डीआरपीमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी जागतिक पातळीवर चार वेळा निविदा काढण्यातही आल्या. मात्र त्याला विकासकांकडून प्रतिसाद लाभला नाही. यामुळे हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी डीआरपीने 1 ते 4 सेक्टरचे तेरा सब सेक्टर तयार करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पाठवला आहे. मात्र त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. सब सेक्टर करूनही पुनर्विकासासाठी विकासक येण्याची शक्यता कमी वाटत असल्याने जर या प्रक्रियेलाही प्रतिसाद न मिळाल्यास बीडीडीच्या धर्तीवर पुनर्विकास करण्याचा मानस असल्याचे सुत्रांनी सांगितले. 

धारावीमधील झोपडपट्ट्यांचा आणि येथील जुन्या इमारतींचा पुनर्विकास लवकरात लवकर व्हावा यासाठी धारावीतील डीआरपी सेक्टर-1 रहिवासी कृती संघाच्या सदस्यांनी आणि धारावीकरांनी धारावी पुनर्विकास प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांची भेट घेत पुनर्विकास प्रक्रिया राबवण्याची मागणी केली होती, मात्र अद्याप या पुनर्विकासाबाबत कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने हा पुनर्विकास प्रकल्प अद्याप रेंगाळलेलाच आहे.

पुनर्विकासाबाबतचा प्रस्ताव तयार करून या अधिवेशनामध्ये मांडण्याच्या हालचाली डीआरपीकडून सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.