Thu, Apr 25, 2019 07:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धनगर आरक्षण; टाटाचा अहवाल पंधरा दिवसात!

धनगर आरक्षण; टाटाचा अहवाल पंधरा दिवसात!

Published On: Aug 04 2018 1:40AM | Last Updated: Aug 04 2018 1:40AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून या संदर्भात नेमलेल्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा (टिस) अहवाल येत्या पंधरा दिवसांत येणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे पदुम मंत्री महादेव जानकर यांनी दिली. 

राज्यभरात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग सुरूच असताना आता धनगर समाजानेही आरक्षणासाठी कंबर कसली आहे. येत्या 15 ऑगस्टपासून आरक्षणाच्या मागणीसाठी विविध संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी धनगर आरक्षणाबाबत सरकारने निर्णायक भूमिका घेतली नाही तर राज्यभरात या समाजाच्या संयमाचा बांध फुटेल, असा निर्वाणीचा इशारा यशवंत क्रांती सेनेचे पदाधिकारी नवनाथ पडळकर यांनी दिला आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन येत्या 10 ऑगस्टला संस्थगित होत असल्याने अहवालाचे गाजर दाखवून जानकर समाजाची फसवणूक करत आहेत. त्यामुळे आंदोलनाच्या कार्यक्रमात कोणताही बदल होणार नसून धनगर समाज रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नसल्याचा इशारा पडळकर यांनी दिला होता,त्या पार्श्‍वभूमीवर जानकर यांनी सरकार या समाजाला आरक्षण देण्यास कटिबद्ध असल्यामुळे समाज बांधवांनी आंदोलन  करू नये, असे आवाहन केले आहे.

महादेव जानकर म्हणाले, धनगर समाजावर ड आणि र या अक्षरामुळे गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय झालेला आहे. हा अन्याय दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, आरक्षण देण्यासाठी काही घटनात्मक तरतुदी असतात, या तरतुदींचे पालन करावे लागणार आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा धनगर समाजाच्या संदर्भातील अहवाल सरकारकडे सादर होण्याची शक्यता आहे. या अहवालाला मंत्रिमंडळात मंजुरी मिळाल्यानंतर तो दिल्लीला पाठवला जाईल. राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आणि सामाजिक न्याय विभागानंतर आदिवासी विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर धनगरांचा आदिवासी जातीत समावेश करून आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल, असा दावाही त्यांनी केला.