Thu, Jun 20, 2019 01:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आरक्षण द्या; अन्यथा भंडारा फुंकू

आरक्षण द्या; अन्यथा भंडारा फुंकू(Video)

Published On: May 23 2018 1:51AM | Last Updated: May 23 2018 1:57AMमुंबई : प्रतिनिधी

धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाहीतर दुसरी ढोलगर्जना आणेवाडीच्या देवासमोर करुन धनगरभंडारा उधळू. त्यामुळे बर्‍याबोलाने आरक्षण द्या, नाहीतर तुमच्या नावाने भंडारा फुंकून चांगभलं केल्याशिवाय आणि येत्या निवडणुकीमध्ये तुमचे पानिपत केल्याशिवाय धनगर समाज स्वस्थ बसणार नाही, असा निर्वाणीचा इशारा समस्त धनगर समाज्याच्या वतीने महाराष्ट्र राज्य धनगर समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रकाश शेंडगे यांनी मंगळवारी येथे सरकारला दिला.

धनगर समाजाला (एसटी) आरक्षण मिळण्यासाठी येथील आझाद मैदानात महाराष्ट्र राज्य धनगर समाजोन्नती मंडळाच्या वतीने ढोलगर्जना आंदोलन करण्यात आले. देव गर्जना देऊन येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत भंडारा उधळत या आंदोलनाला सुरुवात झाली. राज्यभरातुन आलेल्या ढोलपथकानी एकच गर्जना केली व अनोख्या पध्दतीने आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. आंदोलनासाठी सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, पुणेसह महाराष्ट्रतील अन्य जिल्ह्यातील हजारो आंदोलक उपस्थित होते. आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, आमदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार विनय कोरे, हरिभाऊ शेळके,आमदार सुमन पाटील, माजी खासदार निवेदिता माने आदी उपस्थित होते.

आतापर्यंत आमची फक्त फसवणूक केली गेली आहे. आम्हाला आमचा हक्क दिला नाही. पण आता आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे धनगर समाज बांधवाना मार्गदर्शन करताना आमदार शेंडगे म्हणाले.  झोपलेल्या सरकारचे कान उघडण्यासाठी हजारो ढोल घेऊन या आझाद मैदानात आलो आहोत. असा सोहळा मुंबईने या आधी कधीही पाहिला नसेल. मेंढ्यांच्या मागे फिरणारे मेंढपाल ढोल घेऊन याठिकाणी आले आहेत. आदिवासी आहोत हे दाखवण्यासाठी आम्ही आमचे घोंगडे व ढोल घेऊन उपस्थीत आहोत. यापेक्षा तुम्हाला पुरावा काय हवा, असा सवाल त्यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपेचे सोंग घेतले आहे. त्यांना उठवायचे असेल तर एकाचे काम नाही म्हणून हजारो ढोल घेऊन आम्ही आलो आहोत, असे सांगत आपल्याला आरक्षणाच्या लढाईचे रणशिंग फुंकायचे आहे. कोणतीही मोठी लढाई जिंकायची असेल तर ढोल वाजवून त्याची सुरुवात करायची असते. आज तीच सुरूवात झाली आहे, असा सुचक इशारा शेंडगे यांनी दिला.

अदिवासी व धनगर यांना बरोबर घेऊन आरक्षणासाठी प्रयत्न करू, सामाजिक विषमता दूर करण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्‍वासन यावेळी अशोक चव्हाण यांनी दिले. धनगर समाज हा गरीब उपेक्षीत असल्याने त्याला प्रहावात आणले पाहिजे. सरकारने धनगर समाजाला फक्त फसवले आहे. दिलेला शब्द पाळला नाही. बारामतीच्या आंदोलनच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले होते. मात्र आतापर्यंत कॅबिनेटच्या 225 बैठका झाल्या, तरीही अद्याप काहीच निष्पन झाले नाही, अशी आठवणही यावेळी अशोक चव्हाण यांनी करून दिली. यावेळी  बालाजी शिंदे, अशोक कोळेकर कोल्हापूर, खासदार सदाशिव लोखंडे, हरिभाऊ शेळके, धैर्यशील माने, अन्नासाहेब भास्कर, आ. सुमनताई पाटील, धनगर महिला प्रतिनिधी म्हणून मनीषा माने, विवेक कोकरे, आ. हरिभाऊ राठोड, आदीनी मनोगत व्यक्त केले. वैष्णवी या 12 वर्षाच्या मुलीने धनगर समाजाच्या समस्या मांडून सर्वांचीच मन जिंकली.