Wed, Jul 17, 2019 11:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार

आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार

Published On: Aug 14 2018 1:35AM | Last Updated: Aug 14 2018 1:09AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे राज्यातील वातावरण तापले असताना पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीदिनी धनगर समाजही सोमवारी रस्त्यावर उतरला. धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण मिळावे, म्हणून राज्यभर रास्ता रोको करण्यात आला. राज्य सरकारने आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने सोडविला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

देशात धनगड समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्यात आले आहे. धनगर आणि धनगड एकच जात असल्यामुळे धनगर समाजालाही एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे, अशी धनगर समाजाची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी आक्रमक झालेल्या धनगर समाजाने आहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी रस्ते आणि महामार्गांवर साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोमवारी राज्यात ठिकठिकाणी धनगर समाज रस्यावर उतरला होता. काही ठिकाणी तर शेळ्या-मेंढ्यांसह आंदोलन करण्यात आल्याने वाहतूक कोंडी झाली होती. तर काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने सुंबरान मांडत धनगर समाजाने आरक्षणाचा एल्गार केला.

वसईतील पंचवटी नाक्यावर धनगर समाजाने मोर्चा काढल्यानंतर रास्ता रोको केला. रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्येही धनगर समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अहमदनगर मनमाड महामार्गावर चिंचोली फाटा येथे जागरण-गोंधळ घालत रास्ता रोको करण्यात आला. श्रीरामपूर येथे करण्यात आलेल्या आंदोलनात काँग्रेसचे स्थानिक आ. भाऊसाहेब कांबळे हे देखील सहभागी झाले होते. सांगली जिल्ह्यात धनगर समाजाची मोठी लोकसंख्या असून, तेथे धनगर समाज आरक्षण कृती समितीने आंदोलन करून सोलापूर आणि कराडकडे जाणारी वाहतूक रोखून धरली.

उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे आणि नाशिकमध्येही धनगर समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला होता. जळगावमध्ये पहूर, जामनेर आणि मुक्‍ताईनगर येथे धनगर समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. तर विदर्भात नागपूर, अमरावती, यवतमाळ येथे आंदोलने करण्यात आली. नागपूर-वर्धा रोडवर भाजपचे राज्यसभेचे खासदार विकास महात्मे यांच्या नेतृत्वात आंदोलकांनी शेळ्या-मेंढ्या घेऊन रास्ता रोको केला. त्यावेळी महात्मे यांच्यासह 25 जणांना ताब्यात घेण्यात आले. अमरावतीतही राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात आला.

मराठवाड्यात मराठा आंदोलनाची धग असताना, धनगर समाजानेही ठिकठिकाणी आंदोलने केली. औरंगाबाद-पैठण रोडवर रास्ता रोको करण्यात आला. याशिवाय शहरातील हर्सूल, पडेगाव, लिंक रोड आणि चिखलठाणा येथे रास्ता रोको करण्यात आला. जालन्यात जालना-औरंगाबाद रोडवर गोंधळ घालण्यात आला. परभणीत पाथरी, सेलू, जिंतूर, गंगाखेड आणि वालूर या ठिकाणी निदर्शने करण्यात आली. विशेषत: पाथरीत हजारोंचा मोर्चा निघाला. लातूरमधील भुसणी येथेही धनगर समाज शेळ्या-मेंढ्या घेऊन रस्त्यावर उतरला होता. लातूर-निलंगा, लातूर-बिदर मार्गावरील वाहतूकही बंद पाडण्यात आली.

दरम्यान, राज्य सरकारची भूमिका ही धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याचीच आहे. त्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेकडून अहवाल मागविण्यात आला आहे. हा अहवाल लवकरच प्राप्त होणार आहे. हा अहवाल आल्यानंतर कोणत्याही त्रुटीशिवाय आरक्षण मिळेल, असे सांगतानाच आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या करू नये, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी केले आहे.