होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रोज एका मंत्र्याच्या भ्रष्टाचाराची क्लिप बाहेर काढणार : मुंडे 

रोज एका मंत्र्याच्या भ्रष्टाचाराची क्लिप बाहेर काढणार : मुंडे 

Published On: Mar 01 2018 3:14PM | Last Updated: Mar 01 2018 3:21PMमुंबई : प्रतिनिधी

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावरील कथित ऑडिओ क्लीपमुळे गुरुवारी सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. आक्रमक झालेल्या भाजप आमदारांनी ‘धनंजय मुंडे... हाय हाय’, ‘खंडणी सम्राट.. हाय हाय’ अशा घोषणा देत त्यांच्या निलंबनाची मागणी केली. धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर स्‍पष्‍टीकरण दिले आहे. 

वाचा : ‘खंडणी सम्राट... हाय हाय’; भाजप आमदारांचा मुंडेंवर आरोप

मुंडे म्‍हणाले, ‘‘२८ फेब्रुवारी २०१८ रोजी एका वाहिनीवर माझ्याबाबतीत बातमी दाखवली गेली. विधिमंडळात दलाली सुरू आहे असा आरोप केला गेला. ही गोष्ट विधिमंडळाची बदनामी करणारी आहे. सभाग्रुहाने या विरोधात आवाज उठवणे गरजेचे होते मात्र, तसे झाले नाही. अशा खालच्या पातळीचे राजकारण सध्या राज्यात सुरू आहे. याची सुरुवात कोणीही केली असेल पण याचा अंत मात्र विरोधी पक्ष करणार. या प्रकरणाच्या खोलाशी मी गेलो आहे. बातमी कोणी सोडली, कशी सोडली, ती व्यक्ती कोण, कोणाला भेटली हे सर्व मला माहिती आहे. आता यापुढे मी रोज एका मंत्र्याच्या भ्रष्टाचाराची क्लिप बाहेर काढणार.’’

ते म्‍हणाले, ‘‘ही लक्षवेधी सुचना २०१६ मधली आहे. मी पैसे घेतले असतील तर २०१७मध्ये याच लक्षवेधीबाबत तारांकीत प्रश्न कसा उपस्थित झाला ? सत्ताधाऱ्यांनी मला हरवण्याचा प्रयत्न केला पण मी आज जिंकलो आहे. मी ज्या पद्धतीने सरकारविरोधात आवाज उठवतोय ते सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात खुपतंय म्हणून असे आरोप माझ्यावर केले जात आहेत. मी काल दुपारपासून माझ्या शासकीय निवसस्थानी होतो मात्र या वाहिनीच्या एकाही प्रतिनिधीने मला याबाबत विचारणा केली नाही याचे दुखः वाटतं.’’

वाचा : कोरेगाव-भीमा घटनेला सरकारची स्पॉन्सरशिप ? : धनंजय मुंडे 

‘‘क्षुल्लक कारणावरून आज मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. मी सरकारमधील अनेक मंत्र्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढले. जर माझ्यावरील आरोप खरे असते तर तुम्ही मला आज जेलमध्ये टाकले असते. मी जे काही करतो ते इमानदारीने करतो बदनामी करत नाही. जर इमानदारीने काम करूनही माझ्यासोबत असं राजकारण होत असेल तर लोकशाही आहे की नाही याबाबत प्रश्न उपस्थित होतोय.’’ असे मुंडे म्‍हणाले. 

वाचा : शेतकरी गुन्हेगार वाटतात का? : धनंजय मुंडे 

‘‘या सभाग्रुहात मी प्रत्येक मंत्र्यांना अडचणीत आणले आहे. कदाचित हाच राग मनात असल्याने माझ्यावर हे आरोप केल्‍याचा आरोप मुंडे यांनी यावेळी केला. ते म्‍हणाले, ‘‘ तुम्ही हजार अग्नीपरीक्षा घ्या मी त्या अग्नीपरीक्षेला सामोरे जायला तयार आहे. मला निलंबीत करा मला काही परवा नाही मात्र, मी आतापर्यंत या सभाग्रुहात जेवढे आरोप केले त्याची ओपन चौकशी व्हायला हवी.’’