Sun, Jul 21, 2019 06:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिडे गुरुजींच्या विरोधातील पुरावे लपविण्यासाठी धाडसत्र

भिडे गुरुजींच्या विरोधातील पुरावे लपविण्यासाठी धाडसत्र

Published On: Apr 19 2018 1:35AM | Last Updated: Apr 19 2018 1:20AMमुंबई : प्रतिनिधी

एल्गार परिषदेकडे पुरावे राहू नयेत आणि संभाजी भिडे गुरुजींविरोधातील पुरावे नष्ट व्हावे, यासाठी शहरी नक्षलवादाची चुकीची माहिती पुढे करून पुणे पोलिसांनी कबीर कला मंच आणि दलित पँथर पक्षातील कार्यकर्त्यांच्या घर, कार्यालयांवर धाडी टाकल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी मुंबईतील पक्ष कार्यालयात केला.

मुंबई, पुणे आणि नागपुरात केलेली कारवाई भिडे गुरुजींना वाचविण्यासाठी होती. या कारवाईत जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट आणि डीव्हाईसमध्ये कार्यकर्त्यांनी भिडे गुरुजींविरोधात जमविलेले सर्व पुरावे होते. ती 26 मार्च रोजी एल्गार मार्चच्या शिष्टमंडळातील हर्षाली पोतदार यांच्या मोबाईलमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखविण्यात आली होती. यामुळे पुढील काळात कायद्याच्या लढाईसाठी ते आवश्यक होते. परंतु, यामुळे सरकार आणि मुख्यमंत्री अडचणीत येतील या भीतीपोटी असा सगळा डाटा नष्ट करण्याच्या हेतूने या धाडी टाकण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

अ‍ॅड. आंबेडकर पुढे म्हणाले, मुंबई, पुणे आणि नागपुरात टाकण्यात आलेल्या धाडी हुकूमशाही पद्धतीने करण्यात आल्या आहेत. याकरिता मुंबईतील गोवंडी येथील रिपब्लिकन पँथर्स या संघटनेच्या कार्यालयावर 17 एप्रिल रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राम राजमाने आपल्या 15 सहकार्यासह आले होते.  यामध्ये काही पोलीस पुण्यातील, तर काही गोवंडी येथील देवनार पोलीस स्टेशनचे स्थानिक पोलीस होते. त्यांनी सर्च वॉरंट असल्याचे सांगून घरात प्रवेश केला. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेऊन त्यांना संपर्क करू दिला नाही.

छापा टाकलेल्यामध्ये भीमा- कोरेगावची पत्रके, पुस्तके, तीन लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क आणि मोबाईल जप्त केले आहेत. यामध्ये विनित विचारे हा पाहुणा आलेल्या विद्यार्थ्यांचा व्यक्‍तिगत असलेला लॅपटॉप आणि मोबाईलही जप्त करण्यात आला. यामध्ये या विद्यार्थ्याच्या काही नोटस् होत्या. त्याला अभ्यास करण्यासाठी त्यामधील प्रिंटही काढू दिली नाही. अशाप्रकारे पोलिसांनी दडपशाहीपणे धाडसत्रे टाकून सामाजिक कार्यकर्त्यामध्ये दहशतीचे वातावरण पसरविले आहे. या सर्व घटनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचे आरोपही अ‍ॅड. आंबेडकर यांनी केला.