Sat, Jun 06, 2020 10:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › घरपोच मद्यविक्री बेकायदेशीर ठरवत ५० परवाने रद्द

घरपोच मद्यविक्री बेकायदेशीर ठरवत ५० परवाने रद्द

Published On: Aug 13 2018 1:21AM | Last Updated: Aug 13 2018 1:02AMनालासोपारा / ठाणे : प्रतिनिधी

गटारीच्या दिवशी घरीच पार्टी करणार्‍या तळीरामांसाठी ऑनलाईन बुकिंग करीत त्यांना डिलिव्हरी बॉयच्या माध्यमातून घरपोच मद्य उपलब्ध करून देणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला आहे. या कारवाईनंतर मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील 50 वाईन शॉप परवाने तत्काळ रद्द करण्यात आले असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे. मात्र, फोनवर ऑर्डर घेत घरपोच मद्य देणे म्हणजे ऑनलाईन विक्री ठरवण्यात आल्याने या कारवाईवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

राज्यासह मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात गेल्या दोन दिवसांपासून गटारी साजरी करण्याचा उत्साह शिगेला पोहोचला होता. मुंबईतील नाईटलाईफ आणि रेव्ह पार्टीचे आयोजन थाटण्यात आले होते. 022-3000 4000 या क्रमांकावर पत्ता आणि ऑर्डर नोंदवली की, काही मिनिटांतच घरपोच मद्य मिळेल अशी सोय होती. ही माहिती मिळताच शनिवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून हे रॅकेट उघडकीस आणले. 

अमरेश साहू (28) याला अटक करून त्याच्याकडून 57 हजार 231 रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले असून, त्याने दिलेल्या माहितीवरून, नेपियन्सी रोडवरील मोक्ष वाईन शॉपवर कारवाई करण्यात आली. या दुकानातून मिळालेल्या माहितीनुसार, जुहूच्या लिव्हिंग लिक्विड्जवर छापा टाकण्यात आला.  लिव्हिंग लिक्विड्जचा मालक मनीष पारदासनी याला फरार घोषित करण्यात आले असून, लिव्हिंग लिक्विड्जमधून ऑनलाईन तथा व्हाट्स अ‍ॅपवर मध्य विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. लिव्हिंग लिक्विड्जपाठोपाठ मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड येथील सुमारे 50 परवानेधारक मद्यविके्रते नियमबाह्य व्यवहार करत असल्याचे समोर आल्याने त्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. 

लिव्हिंग लिक्विड्जच्या संकेतस्थळावर व्हाट्स अ‍ॅप क्रमांक देण्यात आलेला असून, गेल्या काही वर्षांपासून या क्रमांकावर ऑर्डर दिल्यानंतर घरपोच मद्य मिळत आले आहे. याशिवाय त्यांच्या दूरध्वनी क्रमांकावरही आपला पत्ता सांगून ऑर्डर देता येते. लिव्हिंग लिक्विड्जचा माणूस ऑर्डरप्रमाणे मद्य घेऊन पत्त्यावर येतो. त्याच्यासोबत पीओएस मशीनदेखील असते. म्हणजे ग्राहकाला रोख किंवा कार्डनेही व्यवहार करून मद्य ताब्यात घेता येते. आतापर्यंत सुरळीत सुरू असेलेला लिव्हिंग लिक्विड्जचा व्यवहार अचानक नियमबाह्य कसा ठरला, असा प्रश्‍न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. शिवाय लिव्हिंग लिक्विड्जची मद्यविक्री ऑनलाईन होत नाही. फोनवर ऑर्डर दिल्यानंतर जसा किराणा घरपोच येतो तसेच लिव्हिंग लिक्विड्जचे मद्यदेखील फोनवर ऑर्डर दिल्यानंतर घरपोच मिळते. त्यामुळे अचानक हे सारे छापासत्र कसे सुरू झाले हे कळण्यास मार्ग नाही. 

ऑनलाईन विक्री अजामीनपात्र गुन्हा 

औषधी, ड्रग्स आणि मद्यविक्रीवर शासनाने कडक निर्बंध घातले आहेत. या तीनही गटात मोडणार्‍या पदार्थांची ऑनलाईन विक्री करता येत नाही. तसेच कोणी अशा प्रकारे ऑनलाईन विक्री करताना आढळून आले तर त्यांच्यावर अजामीनपात्र फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो अशी माहिती अ‍ॅड. अविनाश जाधव यांनी दिली. तर देशभरात विविध कंपन्या गर्भपात, नशा, तसेच स्टेरॉइडच्या औषधांची ऑनलाईन माध्यमातून मोठ्या प्रमाणात सर्रास विक्री करत असल्याचे आढळून आले होते. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन ते घातक ठरण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने औषध विक्रेत्यांकडून यासंदर्भात ऑनलाईन विक्रीला देशभरात वारंवार विरोध केला जात होता. ऑनलाईन औषधविक्री करण्यासंदर्भात केंद्र सरकारने एफडीएचे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. त्या समितीचे काम अद्याप सुरू आहे. तसेच ऑनलाईन विक्री करणे योग्य की अयोग्य, या संदर्भात कोर्टातदेखील खटला प्रलंबित आहे. त्यामुळेच कोर्टानेदेखील ऑनलाईन विक्री रोखण्याचे आदेश दिले आहेत.