Wed, Apr 24, 2019 02:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जगण्याने छळले आहे...

जगण्याने छळले आहे...

Published On: May 13 2018 2:27AM | Last Updated: May 13 2018 1:58AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

किंग जॉर्ज मेमोरियलच्या महालक्ष्मी येथील निराधार रुग्ण केंद्रात इंद्रा कटारिया (63) आठ वर्षांपासून राहतात. मी पुढेही इथेच राहणार आहे, असं त्या सांगतात. त्यांना त्यांचा भाऊ शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात सोडून गेला होता. कमजोर स्नायूंमुळे कटारिया यांना चालता येत नव्हते. तो त्यांना सोडून गेला तो परत आलेलाच नाही. कटारिया यांच्यावर तिथे सहा महिने उपचार सुरू होते. त्यांच्या उल्हासनगर येथील घरी पत्रव्यवहार करण्यात आला, मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर रुग्णालयाने त्यांना निराधार रुग्ण केंद्रात पाठवून दिले. 

सरकारी रुग्णालयांत कटारिया यांच्याप्रमाणेच मुक्‍काम वाढविणार्‍या रुग्णांचे प्रमाण अलीकडे वाढीस लागले आहे. निराधार रुग्णांसाठी केंद्रांच्या कमतरतेमुळे सरकारी रुग्णालयांतील खाटांची संख्याही कमी पडू लागली आहे. आम्ही प्रत्येकाला सामावून घेऊ शकत नाही. रोज किमान दोन रुग्णांची निवार्‍यासाठी विचारणा होते, आमच्याकडे केवळ 80 खाटा आहेत आणि अनेक रुग्ण कायमस्वरूपी वास्तव्यासाठी येतात, असे किंग जॉर्ज निराधार रुग्ण केंद्राच्या सहायक अधीक्षक प्रणालिनी लाड यांचे म्हणणे आहे. या निराधार रुग्ण केंद्रात केईएम, सायन आणि नायर इस्पितळातून 60 रुग्ण दाखल झाले आहेत. रुग्ण अंथरुणाला खिळून असेल तर आम्ही त्याला घेतच नाही, कारण आमच्याकडे मनुष्यबळाचा अभाव आहे. आमच्याकडचा प्रत्येक रुग्ण आपली काळजी आपणच घेतो, असे त्यांनी सांगितले. 

प्रत्येक वर्षी केईएम रुग्णालयातून किमान 15 ते 20 रुग्णांसाठी निराधार केंद्रात विचारणा केली जाते. पॅराप्लेगिया, क्षयरोग, आणि शारीरिक दृष्ट्या अपंग अशा रुग्णांचे इस्पितळातील वास्तव्य सामान्यपणे वाढत असते. रुग्णाची हालचाल करण्याची क्षमता संपली असेल तर नातेवाईक त्याला रुग्णालयात सोडून जातात, असे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या संगीता कसबेकर यांनी सांगितले. सामान्यपणे रुग्णालये दोन महिन्यांपर्यंत त्यांच्या नातेवाईकांची वाट पाहतात. नंतर त्यांच्याशी पत्रव्यवहार केला जातो. जेव्हा कुणीही प्रतिसाद देत नाही, तेव्हा पोलिसांकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवून अशा रुग्णांची रवानगी निराधार केंद्रात केली जाते, असे त्या म्हणाल्या. 

कटारिया यांच्याप्रमाणेच सदानंद गावडे (62) यांना केईएम रुग्णालयात त्यांच्या भावाने दाखल केले होते. एकेकाळी दारूच्या प्रचंड आहारी गेलेले गावडे आधी त्यांच्या पालकांसोबत आणि नंतर कुटुंबासोबत राहात होते. त्यांचा घटस्फोट झाला आणि ते भावाबरोबर राहू लागले. आईवडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या भावाने संबंध हळूहळू कमी केले. माझ्या पायांत संसर्ग झाला आणि मी केईएममध्ये आलो, असे गावडे सांगतात.2011 साली त्यांच्यावर उपचार झाले, मात्र त्यांना घेऊन जाण्यास कुणीही आले नाही. नंतर रुग्णालय प्रशासनाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांना महालक्ष्मीच्या निराधार केंद्रात दाखल केले. पुरुष रुग्णांप्रमाणेच महिला रुग्णांना सोडून जाण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. 

शहरात  निराधार रुग्णांसाठी 12 पेक्षा कमी निराधार केंद्रे आहेत. जेव्हा सरकारी रुग्णालयांना आपल्याकडील खाट रिकामी करायची असते तेव्हा अशा रुग्णांना रस्त्यावर सोडण्याशिवाय पर्याय नसतो.  निराधारांना मदत करणार्‍यांना कोशिश या स्वयंसेवी संस्थेचे मोहम्मद तारीक यांच्या म्हणण्यानुसार भिकारी पुनर्वसन केंद्रातील 10 पैकी 3 व्यक्‍ती या भिकारी नाहीत. त्या निराधार रुग्ण आहेत. जे. जे. रुग्णालयात दरवर्षी 25 ते 30 असे रुग्ण दाखल होतात, ज्यांना परत घेऊन जाण्यास कुणीही येत नाही. अधिक पुढच्या टप्प्यात कर्करोग असलेले रुग्ण, मनोरुग्ण आणि वयोवृद्धांना तसेच सोडून जाण्यात येते. आम्ही पोलिसांची मदत घेऊन त्यांच्या कुटुंबीयांना त्यांचा सांभाळ करण्यास भाग पाडतो, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरसे म्हणाले. 

निराधार केंद्रे आणि वृद्धाश्रम यांची संख्या खूप कमी असल्यामुळे रुग्णांना भिकारी पुनर्वसन केंद्रातच राहावे लागते. सरकारी रुग्णालयांतही वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यांची संख्या कमी आहे. शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललित कुमार आनंद यांच्या म्हणण्यानुसार वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. क्षयरोगग्रस्तांना सोडून जाण्याचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. 

बनवारीलाल गुप्‍ता (49) हे 2016 पासून ओडिशातील आपल्या नातेवाईकांची वाट पाहात आहेत. ते आपल्या गावातील लोकांबरोबर कामाच्या शोधात मुंबईत आले होते. 1999 साली आलेल्या वादळात त्यांच्या कुटुंबाचा अंत झाला होता. गुप्‍ता यांना अपघात झाला आणि त्यांच्या पायात 2016 साली विषाणू संसर्ग झाला. कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयातून ते नायर रुग्णालयात आले. त्यांनी आपल्या आजाराची माहिती आपल्या मित्रांना दिली आहे, पण कुणीही त्यांना घेऊन जाण्यासाठी आलेले नाही. शारीरिकदृष्ट्या अपंग आणि कामगार म्हणून काम करण्यास असमर्थ असलेल्या गुप्‍ता यांना निराधार केंद्रात राहावे लागत आहे.