Wed, Mar 20, 2019 22:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लग्नास नकार; प्रेयसीच्या आईवर हल्ला

लग्नास नकार; प्रेयसीच्या आईवर हल्ला

Published On: May 31 2018 1:42AM | Last Updated: May 31 2018 12:46AMभिवंडी : वार्ताहर

मुलीशी प्रेमसंबंध असताना लग्नास नकार दिल्याच्या रागातून प्रियकराने प्रेयसीच्या आईवर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेसमोर भररस्त्यावर घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रियकराने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात प्रेयसीची आई गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर ठाण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. दरम्यान, या मारहाणीत प्रियकरही जखमी झाला असून त्याच्यावर काल्हेर येथील एसएस रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी दोघांनीही एकमेकांविरोधात दाखल केलेल्या तक्रारीनुसार नारपोली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

काल्हेर गावातील जयगुरुदेव कॉम्प्लेक्समध्ये राहणारी ज्योती (नाव बदलेले) आपल्या आईवडिलांसोबत राहत असून ती त्याच परिसरातील एका महाविद्यालयात वाणिज्य शाखेत 13 वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. या दरम्यान दीड वर्षांपासून पूणार्र् गावातील फोटोग्राफीचा व्यवसाय करणार्‍या साकेतशी (18) तिचे प्रेमसंबंध जुळले होते. या दोघांना यावर्षी लग्न करायचे होते. त्यामुळे प्रेयसीच्या आईकडे साकेत याने आमचे एकमेकांवर प्रेम असून मला ज्योतीशी लग्न करायचे आहे, अशी मागणी काल्हेर गावातील एका शाळेच्या समोरच भररस्त्यावर केली. मात्र साकेत हा व्यसनी असल्याची माहिती प्रेयसीच्या आईला मिळाल्याने तिने लग्नास नकार दिला. यामुळे दोघांमध्ये वादविवाद होऊन वादाचे रुपांतर जोरदार हाणामारीत झाले. 

याप्रकरणी साकेतवर भादंवि. कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर साकेत याने दिलेल्या तक्रारीवरून प्रेयसीच्या आईविरोधात  पोलिसांनी कलम 324 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.