Tue, May 21, 2019 19:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महिला डॉक्टरला धमकी देत  45 लाखांच्या खंडणीची मागणी

महिला डॉक्टरला धमकी देत  45 लाखांच्या खंडणीची मागणी

Published On: Jul 04 2018 2:16AM | Last Updated: Jul 04 2018 1:14AMमुंबई : प्रतिनिधी

माहिती अधिकाराखाली माहीती मागवून तसेच संबंधित यंत्रणांकडे तक्रारी करुन दवाखाना बंद पाडण्याची धमकी देत, तीन जणांनी पवईतील 52 वर्षीय महीला डॉक्टरकडे 45 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करुन पवई पोलीस तपास करीत आहेत.

पोलिसांकडे नोंदविण्यात आलेल्या तक्रारीनुसार, पवईतील आयआयटी मेनगेटसमोरील पवई पाली क्‍लिनीक अ‍ॅन्ड हॉस्पीटलच्या मालक डॉ. शर्मिला जाधव (52) या हॉस्पीलमध्ये व्यवस्थापक म्हणून नोकरी करत असलेल्या गितांजली सुवर्णा (44) यांच्यासोबत याच ठिकाणी राहातात. आई-वडिलांच्या निधनानंतर हे हॉस्पीटल डॉ. जाधव या चालवत आहेत. डॉ.जाधव यांना तीन बहिणी आहेत. या कुटूंबामध्ये मालमत्तेवरुन वाद सुरु असताना यातील एका बहिणीचा पती रमेश शर्मा याने या हॉस्पीटल विरोधात तक्रारी सुरु केल्या. 

शर्मा यांच्यासोबतच माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणवून मिरवणारा दिनेश होजगे हा सुद्धा हॉस्पीटल विरोधात तक्रार करुन डॉ.जाधव यांना त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून डॉ. जाधव यांनी पवई पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेकडे तक्रारीसुद्धा केल्या. तसेच होजगे याच्या तक्रारीवरुन संबंधित यंत्रणांकडे जाऊन डॉ. जाधव त्यांना हॉस्पीटलची कागदपत्रे दाखवत स्पष्टीकरण देत होत्या. दरम्यान, होजगे याने हॉस्पीटलमधील कर्मचार्‍यांचा भविष्य निर्वाह निधी भरला जात नसल्याची तक्रार संबंधित विभागाकडे केली.

काही वर्षांपासून तक्रारी सुरु असतानाच मार्च 2018 मध्ये डॉ. जाधव यांच्या बहिणीचा नवरा शर्मा याने त्यांना फोन करुन होजगेसोबत सेटलमेंट करण्याचा प्रस्ताव ठेवला. होजगे याच्या तक्रारींचा त्रास होत असल्याने आणि त्याचा त्रास देण्यामागचा उद्देश समजण्यासाठी डॉ. जाधव यांनीही होकार दर्शविला. त्यानुसार शर्मा याने 7 एप्रिल रोजी ठाण्यातील एका हॉटेलमध्ये भेटण्याचे ठरविले. डॉ. जाधव या भेटीसाठी गेल्या असता, हॉटेलमध्ये शर्मा आणि होजगे याच्यासोबत सागर चाळसे, भोईर नावाच्या व्यक्ती उपस्थीत होता. 

भविष्य निर्वाह निधीबाबत केलेल्या तक्रारीसह आपल्याविरोधात पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन दीड कोटी रुपयांचा अब्रु नुकसानीचा दावा दाखल करण्याची धमकी देत, होजगे चाळसे आणि भोईर यांनी प्रकरण मिटविण्यासाठी 45 लाख रुपयांची मागणी केली.  त्यांनी रक्कम देण्यास नकार देत विचार करण्यासाठी वेळ मागितला. 

हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीनंतर शर्मा हे डॉ. जाधव यांना सतत फोन करुन मिटींगचे काय झाले, अशी विचारणा करत होते. अखेर शर्मा यांनी 7 जून रोजी पून्हा या तिघांसोबत मिटींग ठरविली. एवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे डॉ. जाधव यांनी सांगताच रक्कम कमी करुन 20 लाख 50 हजार रुपयांची मागणी केली. यावेळीही काही दिवसांचा वेळ मागून घेतला असता, चाळसे याने 11 जून रोजी पून्हा बैठक ठेवली. याच दिवशी भविष्य निर्वाह निधीबाबत केलेल्या तक्रारीची सुनावणी होती. डॉ. जाधव या मिटींगला गेल्या नाहीत, त्यांनी दुसर्‍या दिवशी सकाळी पवई पोलीस ठाणे गाठून होजगे, चाळसे आणि भोईर विरोधात तक्रार दिली.