Fri, Jul 19, 2019 00:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हिरानंदानींकडे वीस कोटींच्या खंडणीची मागणी

हिरानंदानींकडे वीस कोटींच्या खंडणीची मागणी

Published On: Mar 16 2018 1:26AM | Last Updated: Mar 16 2018 12:55AMपवई : वार्ताहर

हिरानंदानी बिल्डर्सकडे 20 कोटी रुपयांची खंडणी मागणार्‍या पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य गुलाब पारखे (53) याला पवई पोलिसांनी गुरुवारी बेड्या ठोकल्या. त्याच्या गाडीचा चालक विठ्ठल फलके(42) यालाही अटक करत फॉर्च्युनर गाडी आणि स्वीकारलेले  एक कोटी रुपये ताब्यात घेण्यात आले आहेत.

जुन्नर तालुक्यातील शिवसेनेतील एक मोठी नावाजलेली व्यक्ती म्हणून त्याची ओळख आहे. गेली 27 वर्षे गुलाब पारखे विकासकाकडे काम करीत होता. जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून त्याने काम करणे बंद केले होते.2016 पासून पैशाच्या हव्यासापोटी त्याने हिरानंदानी विकासकाच्या पवई येथील विविध ठिकाणी सुरु असलेल्या इमारतींच्या कामाबाबत हरकती घेऊन मुंबई महापालिका व नगर भूमापन विभागात तक्रारी करून त्यांचे काम थांबवण्याचा प्रयत्न केला. यामुळे हिरानंदानीचे अनेक प्रोजेक्ट रखडले गेले होते. तक्रारी मागे घेण्यासाठी त्याने नोव्हेंबर 2017 रोजी 20 कोटी रुपयांची मागणी हिरानंदानी बिल्डरच्या अधिकार्‍यांकडे केली होती. पहिला हफ्ता 10 लाख रुपये त्याने या अगोदर जानेवारी महिन्यात घेतला. या काळातील सर्व फोन कॉल हिरानंदानी बिल्डर्सच्या कर्मचार्‍यांनी रेकॉर्डिंग करून ठेवले होते.

पुन्हा एक कोटी रुपयांची मागणी झाल्यानंतर संपूर्ण फोन कॉल रेकॉर्डिंग आणि पुराव्यांसह हिरानंदानी गार्डन पवई कम्युनिटी प्रा. लि. कंपनीचे अर्जुन धायतडके यांनी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी कलम 384 अंतर्गत गुन्हा नोंदवला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार करून एक कोटी रुपये आरोपीस देण्याकरता मुलुंड येथील शुभम हॉटेलमध्ये सापळा रचला आणि आरोपी अलगद जाळ्यात सापडला.  आरोपींना न्यायालयात हजर केले असता 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.