Wed, Nov 21, 2018 17:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काम कमी, सुट्ट्या अधिक

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काम कमी, सुट्ट्या अधिक

Published On: Feb 12 2018 2:13AM | Last Updated: Feb 12 2018 2:02AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

जनतेच्या कामांसाठी विधिमंडळाचे अधिवेशन घेण्यात येत असले तरी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचे दिवस दरवर्षी कमी केले जात आहेत. 2017 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी 35 दिवस असताना कामकाज केवळ 20 दिवस झाले. यंदासुद्धा कालावधी 35 दिवस असताना कामकाज 22 दिवसांमध्ये आटोपते घेतले जाणार आहे. कामाकाजाला 13 दिवस सुट्ट्या मिळणार आहेत.

यंदा राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 26 फेब्रुवारीपासून सुरू झाल्यानंतर 2 मार्च रोजी होळी, तर 3 आणि 4 मार्च रोजी शनिवार व रविवार असल्यामुळे कामकाज होणार नाही. 10, 11 आणि 17, 18 तसेच 24 व 25 मार्च रोजी शनिवार व रविवार आहेत. याशिवाय 29 मार्च रोजी महावीर जयंती, 30 मार्च गुड फ्रायडे, तर शनिवार 31 मार्च व 1 एप्रिल रोजी रविवार असल्यामुळे कामकाजाला सुट्टी असेल.

विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाचे दिवस दरवर्षी कमी केले जात असल्याबद्दल विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. राज्यात काँग्रेस आघाडी सरकार असताना नागपूर येथे दरवर्षी तीन आठवड्यांचे हिवाळी अधिवेशन घेतले जात होते. हा कालावधी कमी असल्याचे सांगत या अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी भाजपचे तत्कालीन नेते करत होते. आता ते सत्तेत असताना यंदाचे हिवाळी अधिवेशन दोन आठवड्यात गुंडाळण्यात आले. सरकारची ही एकप्रकारे दडपशाही असल्याचा आरोप विखे-पाटील यांनी केला असून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणीही त्यांनी केली आहे.