होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुलगुरुंच्या नियुक्‍तीची घोषणा लांबणीवर?

कुलगुरुंच्या नियुक्‍तीची घोषणा लांबणीवर?

Published On: Apr 20 2018 1:32AM | Last Updated: Apr 20 2018 1:32AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या नवीन कुलगुरुंच्या पदासाठी निवड झालेल्या अंतिम पाचही उमेदवारांनी गुरुवारी दुपारी राज्यपाल सी. विद्यासागर यांच्याकडे सादरीकरण केले मात्र राजभवनकडून गुरुवारी रात्री उशिरापर्यंत कुलगुरु पदाचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.  

नवीन कुलगुरु नेमण्यासाठी निवडलेल्या शोध समिती सदस्यांनी नागपूर विद्यापीठाचे डॉ.प्रमोद येवले, रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर, अमरावती विद्यापीठाचे डॉ. विलास सकपाळ, जबलपूर विद्यापीठाचे डॉ. शरद कोडेंकर आणि मुंबई विद्यापीठाचे डॉ. अनिल कर्णिक यांनी गुरुवारी राजभवन येथे सादरीकरण केले. राज्यपाल किंवा त्यांच्या कार्यालयाकडून मात्र कुलगुरुंच्या नावाची घोषणा करण्यात आली नाही. 

कुलगुरु पदाची घोषणा लांबणीवर पडल्याने विद्यापीठ वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे, राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरु नेमणूका सादरीकरण झाल्यानंतर तातडीने झाल्या आहेत. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरु पदाच्या निवडीसाठीही राजभवनकडून मुलाखती झाल्यानंतर काही दिवसांनी उशिरा डॉ. देवानंद शिंदे यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरु पदाच्या नावाचीही घोषणा लांबणीवर पडल्याने राजभवनातून काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे.