Fri, Apr 26, 2019 00:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र धोक्यात!

विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र धोक्यात!

Published On: Apr 09 2018 1:50AM | Last Updated: Apr 09 2018 1:46AMमुंबई : प्रतिनिधी

परीक्षांचे निकाल वेळेवर न लागल्याने तब्बल पदवी आणि पदवीव्युत्तर अभ्यासक्रमातील 30 परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे, या परीक्षा मेच्या दुसर्‍या आठवड्यात सुरू होणार आहेत त्यामुळे जूनपर्यंत लांबवत नेल्याने गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र धोक्यात येणार आहे, परीक्षाच उशिरा होणार त्यामुळे निकालाची वाट पाहात या विद्यार्थ्यांच्या करिअरचा बोर्‍या वाजण्याची चिन्हे आहेत.

गतवर्षी ऑनलाईन असेसमेंट निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश उशिरा झाले. हा सावळा गोंधळ मुुंबई विद्यापीठाने यंदाही सुरूच ठेवला असून शनिवारी तब्बल 30 परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले. प्रलंबित निकालाची धावपळ सुरू असल्याने उन्हाळी सत्रातील परीक्षा पुढे ढकलल्याची कारणे विद्यापीठाकडून सांगितली जात आहेत, विद्यापीठाने शनिवारी पुढे ढकलण्यात आलेल्या वेळापत्रकाचे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर टाकले आहे. सर्वच परीक्षा सरासरी एक महिन्याने पुढे ढकलण्यात आल्या आहेत.  सायन्स शाखेतील एमएस्सी फॉरेन्सिक सायन्स सेमिस्टर 1 ची परीक्षा आता 16 एप्रिल ऐवजी थेट 4 जूनपासून सुरू होणार आहे. 

एमएस्सीच्या अन्य विषयांच्या परीक्षाही मेच्या मध्यापर्यंत व मेअखेरपर्यंत लांबल्या आहेत. बीकॉमच्या परीक्षाही 2 मे ते 15 मे दरम्यान सुरू होतील. त्या याच महिन्यात संपणे अपेक्षित होते. (सविस्तर तक्‍ता पाहा)

परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या या परिपत्रकानुसार कॉमर्स आणि मॅनेजमेंट शाखेसह आर्ट्स शाखेच्या सर्वाधिक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ज्यात बीकॉम (फायनान्सियल मॅनेजमेंट, सेमिस्टर पाच), बीकॉम (अकाऊंट्स अ‍ॅण्ड फायनान्स) या परीक्षांचा समावेश आहे. तर आर्ट्स शाखेच्या टीवायबीए, एमएच्या परीक्षांचा समावेश आहे. 

मुंबई विद्यापीठाच्या निकाल गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची प्रतीक्षा कायम आहे. वेळापत्रक जाहीर केल्याने अनेक विद्यार्थ्यांनी याविरोधात तक्रार केली होती. त्याचप्रमाणे अनेक परीक्षांचे निकाल उशिराने जाहीर झाल्याने परीक्षेसाठी कमी वेळ मिळाला आहे. त्यामुळे असंख्य     विद्यार्थ्यांनी परीक्षा व मूल्याकंन विभागाकडे तक्रार करीत हे वेळापत्रक बदलण्याची मागणी केली होती. त्यामुळे शनिवारी विविध अभ्यासक्रमाचे एकूण 30 परीक्षांचे वेळापत्रक बदलले असल्याची माहिती परीक्षा विभागाने दिली आहे.

अर्थात हा मागील वर्षी झालेल्या गोंधळाचाही परिणाम आहे. मागच्या वर्षी निकालच उशिरापर्यंत लागत राहिले आणि ओघानेच शैक्षणिक वर्षही प्रचंड उशिरा सुरू झाले. त्याचा परिणाम अभ्यासक्रम अपुरा राहण्यात झाला. अनेक विषयांचे वर्गही झालेले नसताना परीक्षा घोषित झाल्या. त्यामुळे घोषित वेळापत्रकाला विद्यार्थ्यांकडून विरोध होणे साहजिक होते. 

Tags : mumbai, mumbai news, Decision, postpone, 30 exam, degree and postgraduate course,