Tue, Jul 16, 2019 12:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अकरा गिरण्यांच्या मालकांकडून घरांसाठी इंचभरही जमीन नाही

अकरा गिरण्यांच्या मालकांकडून घरांसाठी इंचभरही जमीन नाही

Published On: Jan 30 2018 2:17AM | Last Updated: Jan 30 2018 1:39AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईमधील विविध बंद असलेल्या कापड गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांना हक्काची घरे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र मुंबईतील अकरा गिरण्यांच्या मालकांनी एक इंचही जमीन गिरणी कामगारांच्या घरांसाठी दिलेली नाही, असा आरोप गिरणी कामगार संघर्ष समितीने केला आहे. 

गिरण्यांच्या मालकांनी महापालिका अधिकार्‍यांना हाताशी धरून गिरण्यांच्या जमिनींवर बांधकामे केली आहेत. या प्रकरणी स्वतंत्र कक्ष नेमून प्रामाणिकपणे चौकशी होणे गरजेचे असल्याचे समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

मुंबईतील बंद कापड गिरण्यांच्या जागेवर घरे बांधण्याचा निर्णय झाल्यावर काही गिरणी मालकांनी एक तृतीयांश जमीन म्हाडा व मुंबई महापालिकेला दिली. पण तब्बल अकरा गिरणी मालकांनी एक इंचही जमीन गिरणी कामगारांच्या घरांसाठी दिली नाही. या बंद गिरण्यांच्या जागेवर विविध बांधकामे झाली आहेत. कामगारांचा हक्क डावलून गिरण्यांच्या मालकांनी गिरण्यांचे भूखंड लाटले. गिरण्यांच्या मालकांनी पालिका अधिकार्‍यांना हाताशी धरून गिरण्यांच्या जमिनींवर इमारती उभारल्या असून याबाबत स्वतंत्र कक्ष नेमून प्रामाणिक चौकशी व्हावी, अशी आमची मागणी असल्याचे गिरणी कामगार नेते प्रवीण घाग यांनी सांगितले. तसेच या समितीमध्ये संघटनेच्या प्रतिनिधींचाही समावेश करावा असेही घाग यावेळी म्हणाले. 

कमला मिल, रघुवंशी व फिनिक्स मिलच्या मालकांनी गिरण्यांच्या जागेवरील बांधकामाची दुरुस्ती करून त्यावर बार, पब, हुक्का पार्लर, मॉल सुरू केल्याचे घाग यावेळी म्हणाले. तसेच जर या गिरण्यांची जागा मिळाली तर या जागेवर गिरणी कामगारांसाठी सहा हजार घरे उपलब्ध होऊ शकतील, असेही ते यावेळी म्हणाले.