Thu, Jun 20, 2019 00:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पावसात सुट्टीचा अधिकार  पालिकेला

पावसात सुट्टीचा अधिकार  पालिकेला

Published On: Jul 12 2018 1:42AM | Last Updated: Jul 12 2018 1:05AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईत यापुढे अतिवृष्टीच्या काळात शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय मुंबई महापालिका घेईल. हवामान खात्याने दिलेल्या इशार्‍यानुसार शाळांना पूर्ण किंवा अर्धा दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेणारे परिपत्रक पालिकेमार्फत काढण्यात येईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी स्पष्ट केले. 

मुंबईत मंगळवारी मुसळधार पाऊस कोसळत असताना शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली नाही. हवामान खात्यान अतिवृष्टीचा इशारा दिलेला असताना आणि बर्‍याच ठिकाणी पाणी साचलेले असतानाही शाळा बंद ठेवण्याबाबत स्पष्ट आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले नाहीत. शिक्षणमंत्री तावडे यांनीही सुट्टीची तशी गरज नसल्याचे म्हटले होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी उठवलेली टीकेची झोड. सोशल मीडियावरून व्यक्त करण्यात आलेल्या संतापाच्या पार्श्‍वभूमीवर उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी तातडीने मुंबई गाठत पालिका मुख्यालयातील आपत्ती निवारण कक्षाला भेट देऊन आपत्कालीन व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी महापौर विश्‍वनाथ महाडेश्वर, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष  शेलार आदी उपस्थित होते.

मुंबई आणि उपनगरात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असेल आणि  खरोखरच अतिवृष्टी होत असेल तर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन शाळा बंद ठेवण्याबाबत मुंबई पालिका निर्णय घेईल. त्यासंदर्भात सकाळी 6 वाजेपर्यंत पालिकेमार्फत परिपत्रक जारी करण्यात येईल. पालिका, खाजगी, सीबीएसई, आयसीएसई, आयबी बोर्डाच्या शाळांना हा निर्णय लागू असेल. त्यानुसार शाळांचे दिवस कमी-जास्त करण्याबाबत शिक्षण विभागाकडून कार्यवाही करण्यात येईल, असे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

अतिवृष्टीच्या काळात तत्काळ उपायोजना करण्यासाठी शासकीय कृती यंत्रणेची एक समन्वय समिती करण्यात येईल. ही समिती तत्काळ व्हिडिओ कॉन्फरन्सदवारे सर्व यंत्रणेशी जोडली जाईल. यामध्ये मुंबई महानगरपालिका, एमएमआरडीए, रेल्वे, बेस्ट, म्हाडा, जिल्हाधिकारी, परिवहन या सर्व यंत्रणा एकत्रपणे काम करतील. मुंबई आणि उपनगरात जवळपास 225 अशी ठिकाणे आहेत की जेथे पाणी साचून राहते. या ठिकाणच्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने व्हावा यासाठी संबंधित यंत्रणांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यासंदर्भात मुंबई पालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीस पालिका आयुक्त अजोय मेहता, पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल, कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए.के.गुप्ता, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे आदी उपस्थित होते.