Thu, Apr 25, 2019 15:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महिन्यात अहवाल आल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत निर्णय

महिन्यात अहवाल आल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत निर्णय

Published On: Jul 30 2018 1:40AM | Last Updated: Jul 30 2018 1:40AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य मागासवर्गीय आयोग सर्व बाबी तपासून पाहत असून, या आयोगाचा महिनाभरात अहवाल येईल, त्यानंतर आरक्षणाबाबत निर्णय घेऊ, अशी ग्वाही देतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नाही. सकल मराठा समाजाने राज्यात शांतता राखावी, असे आवाहनही केले. मराठी आंदोलकांच्या  काही प्रतिनिधींशी ‘सह्याद्री’ अतिथीगृहात रविवारी झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. खा. नारायण राणेंच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर आरक्षणाबाबतच्या सर्व वैधानिक बाबी तपासून त्याबाबत विधिमंडळ सभागृहात चर्चा होईल. सध्या आरक्षण लागू नसले, तरी मेगा नोकरभरतीबाबत या समाजाच्या तरुणांवर अन्याय होणार नाही, अशी काळजी घेतली जाईल. आंदोलनादरम्यान तरुणांवर दाखल केलेले 307 सह सर्व प्रकारच्या केसेस मागे घेण्यात येतील. मात्र, पोलिसांवर हल्ले  आणि जाळपोळींसारख्या प्रकारात व्हिडीओंमध्ये दिसणार्‍यांवरील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत. हिंसा करणार्‍या आणि पोलिसांना मारहाण करणार्‍यांवरील खटले मागे घेतल्यास राज्यात अराजकतेची स्थिती निर्माण होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्‍त केली.

आंदोलनात काही संशयित लोक घुसल्याच्या अनेक तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेतली जाणार असून, घुसखोरांबाबतची पडताळणी करण्यात येईल. आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या तरुणाचा झालेला मृत्यू दुर्दैवी असून, तरुणांनी अशा गोष्टी करू नयेत, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले. 

मराठा आरक्षणाबाबत उद्यादेखील कोणी आले तरी सरकार त्यांच्यासोबतही चर्चा करील, अशी सकारात्मक भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली. खा. राणे यांनीही मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानतर सरकार आरक्षणाबाबत गतीने पावले उचलेल, असा विश्‍वास व्यक्‍त केला.

मराठा नेत्यांच्या सुरक्षेच्या कारणामुळे थेट प्रक्षेपण टाळले?

खा. राणे यांच्या पुढाकाराने ‘सह्याद्री’वर बोलविलेल्या बैठकीला कोणीही उपस्थित राहू नये, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या काही नेत्यांनी केले होते; पण आज काही नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीचे दूरचित्रवाहिन्यांवर थेट प्रक्षेपण करण्याची सूचना राणे यांनी केली होती; पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी ती मान्य केली नाही. यामागे बैठकीला उपस्थित असलेल्या नेत्यांच्या सुरक्षेचे कारण पुढे केले जात आहे.