Sun, Mar 24, 2019 12:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘नाणार’ प्रकल्प होणारच

‘नाणार’ प्रकल्प होणारच

Published On: Jun 29 2018 1:37AM | Last Updated: Jun 28 2018 11:58PMमुंबई : प्रतिनिधी

नाणार प्रकल्पावरून शिवसेना- भाजपामध्ये वाद सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्प होणार, असे ठणकावले आहे. नाणारच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार राहणार, प्रकल्प जाणार, असे जाहीर केले होते. त्याला मुख्यमंत्र्यांनी त्याच भाषेत उत्तर दिले आहे. नाणारला होणारा विरोध संघर्षाने नाही, तर संवादाने दूर करू, असेही ते म्हणाले.
नाणार प्रकल्पासंदर्भात राज्याच्या दौर्‍यावर असलेले केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते.

नाणार प्रकल्प महाराष्ट्रात येणे ही महाराष्ट्राच्या भाग्याची गोष्ट असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान यांचे आपण त्यासाठी आभार मानतो. या प्रकल्पामुळे राज्यात मोेठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असून, सगळ्यात मोठी रिफायनरी महाराष्ट्रात सुरू होत आहे.महाराष्ट्राच्या फायद्याचा हा प्रकल्प  आहे. शिवसेनेचे नाव न घेता त्यांनी काही लोक या प्रकल्पाला विरोेध करत  आहेत, मात्र त्यांचा विरोध आपण चर्चेने सोडवू. याबाबत आपली भूमिका ही संघर्षाची नाही, तर संवादाची आहे, असेही ते म्हणाले.

मीही शेतकरीच : प्रधान

धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी बोलताना नाणार प्रकल्पावरून शिवसेनेवर नाव न घेता टीका केली. बुधवारी धर्मेंद्र प्रधान यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारली होती. त्याचा संदर्भ देत प्रधान यांनी मानसन्मानाचा व प्रतिष्ठेचा कोणताही मुद्दा नसल्याचे सांगितले.  आपणही शेतकरी वर्गातून आलो असून, जमीन संपादनाचे दु:ख काय असते, त्याची आपल्यालाही जाणीव असल्याचे प्रधान म्हणाले. याबाबत आपण खुल्या चर्चेला तयार असल्याचे सांगत त्यांनी याबाबत आपण आपली भूमिका सविस्तरपणे स्पष्ट करणार असल्याचेही सांगितले.

नाणार नेमके काय आहे...

रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल लिमिटेड (आरआरपीसीएल) असे कंपनीचे नाव आहे. या कंपनीच्या वतीने  ग्रीन फिल्ड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प नाणार येथे उभारण्यात येणार आहे. खनिज तेलावर प्रक्रिया करणारा हा प्रकल्प आहे. जगातील सगळ्यात मोठी रिफायनरी असा दावा सरकारने केला आहे. दररोज 12 लाख बॅरल कच्च्या तेलावर प्रक्रिया केली जाणार आहे. या रिफायनरीला वीजपुरवठा करण्यासाठी 2 हजार 500 मेगावॅटचा औष्णिक वीज प्रकल्प उभा केला जाणार आहे.