Wed, Jul 17, 2019 00:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवराज्याभिषेकसाठी गेलेल्‍या तरूणाचा डोक्यात दगड पडून मृत्‍यू 

शिवराज्याभिषेकसाठी गेलेल्‍या तरूणाचा डोक्यात दगड पडून मृत्‍यू 

Published On: Jun 06 2018 6:25PM | Last Updated: Jun 06 2018 6:34PMमहाडः प्रतिनिधी

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर गेलेल्‍या शिवभक्‍ताचा गडावरून दगड डोक्यात पडल्याने मृत्‍यू  झाला. अशोक दादा उंबरे (वय १९, रा. उळूप, ता. भूम, जि. उस्मानाबाद) असे मृत्‍यू झालेल्‍या तरूणाचे नाव आहे. दुसऱ्या घटनेत एक शिवभक्त जखमी झाला आहे. त्याच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

शिवराज्याभिषेक सोहोळ्यानंतर पायऱ्या उतरून खाली येत असताना, गडावरून सुटलेला एक दगड थेट अशोकच्या डोक्यावर  आदळला. त्‍यामुळे अशोक गंभीर जखमी झाला. त्‍याला पाचाड येथील प्रथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, तत्‍पूर्वीच त्‍याचा मृत्‍यू झाला होता.  

दगड कोसळण्याच्या दुसऱ्या घटनेत अमित मांगरे (रा. खेड शिवापूर, जि. पुणे) हा तरूण जखमी झाला आहे. त्याला उपचारांसाठी महाड ग्रमीण रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
शिवराज्याभिषेक सोहोळ्यानंतर गड उतरण्यासाठी शिवभक्तांची प्रचंड गर्दी झाली होती. अरूंद पायऱ्या आणि अरूंद महादरवाजाच्या ठिकाणी शिवभक्तांना पुढे जाता येणे शक्य होत नव्हते. त्यामुळे प्रत्येक शिवभक्ताला तो ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर प्रधिकरणाचे अध्यक्ष खा. संभाजीराजे छत्रपती, अतिरिक्त पोलिस अधिक्षक संजयकुमार पाटील हे महादरवाजाजवळ गेले आणि त्यांनी शिवभक्तांना आवश्यक त्या सूचना देत ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी थांबण्याचे आवाहन केले.