होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई महापालिकेच्या 38 कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई महापालिकेच्या 38 कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू

Last Updated: May 29 2020 1:32AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

सारे प्रशासकीय कौशल्य पणाला लावून जे भयंकर वास्तव आतापर्यंत दडवून ठेवले गेले ते अखेर समोर आले आहे. मुंबईतुन कोरोनाला हद्दपार करण्यासाठी दिवस-रात्र कार्यरत असलेल्या मुंबई महापालिकेच्या तब्बल 1529 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 38 जणांचा मृत्यू झाला असून 967 पेक्षा जास्त कर्मचारी बरे होऊन घरी परतले आहेत.

मुंबई महानगरपालिकेचे 60 टक्के पेक्षा जास्त कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेत येतात. त्यामुळे मुंबईसह देशात लॉकडाऊन लागू असतानाही पालिका कर्मचारी कार्यरत होते. यात डॉक्टरांसह नर्सेस, वॉर्डबॉय, अधिकारी, आपत्कालीन कक्ष, सफाई कामगार, अग्निशमन दल व सुरक्षा विभाग कर्मचारी आदींचा समावेश आहे. राज्य सरकार मध्ये 5 टक्के कर्मचारी उपस्थित असतानाही मुंबई महानगरपालिकेमध्ये 75 टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेसह आता अन्य विभागातील कर्मचार्‍यांनाही कामावर उपस्थित रहावे लागत आहे. महापालिकेत कार्यरत असलेले 40 टक्के कर्मचारी हे मुंबईबाहेरून वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कर्जत, कसारा, बदलापूर, अंबरनाथ आदी भागातून मुंबई येतात. या कर्मचार्‍यांसाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. पण या कर्मचार्‍यांकडे कोरोना पासून बचाव करण्यासाठी मास्क व्यतिरिक्त अन्य कोणतीही सुविधा नाही.

पण कारवाई टाळण्यासाठी या कर्मचार्‍यांना रोज चार ते पाच तास प्रवास करून आपल्या कार्यालयात पोहचावे लागत आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबई महानगर पालिकेच्या आपत्कालिन विभागासह सुरक्षा विभाग, अग्निशमन विभाग, हॉस्पिटल्स व आरोग्य खात्यातील कर्मचार्‍यांना कोरोनाची सर्वाधिक लागण झाली आहे. आतापर्यंत 1638 कर्मचार्‍यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 38 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पालिका प्रशासनाने कोरोना बाधित कर्मचार्यांची माहिती देण्यास नकार दिला होता. मात्र कामगार संघटनांनी करोना बाधित कर्मचार्‍यांची आकडेवारी देण्यासाठी आग्रही भूमिका धरल्यामुळे आता कर्मचार्‍यांची आकडेवारी उपलब्ध झाली आहे. अग्नीशमन दलात 35 जणांना कोरोना झाला, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.  सुरक्षा विभागातील 80 जणांना कोरोना झाला. यातील एकाचा मृत्यू झाला आहे. आपत्कालीन कक्षातील 13 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली होती. तर अन्य कर्मचारी आरोग्य विभाग, हॉस्पिटल व अन्य खात्यातील असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

प्रशासनाचा गोेंधळही जबाबदार

कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने वेळोवेळी 25%, 50%, 100% आणि 75% अशा प्रकारच्या उपस्थितीतीची परिपत्रके काढली. परंतु विभाग कार्यालयांमध्ये वरिष्ठांना देण्यात आलेल्या अधिकारामुळे या परिपत्रकांचे कोणतेही पालन होत नाही. लेखी स्वरूपात निर्देश न देता 100% उपस्थितीचा आग्रह धरला जातो. आजही हेच चालू आहे. दळणवळणाची साधने बंद असून केवळ अत्यावश्यक सेवेकरिता तुटपुंज्या बसेस पुरविल्या जात आहेत. येण्या जाण्याची प्रचंड अडचण समजून घेतली जात नाही.  या गोंधळामुळेही पालिकेचे कर्मचारी कोरोनाचे बळी ठरत असल्याचे काही कर्मचारी सांगतात.  कार्यालयांमध्ये अजिबात काम नसतानाही यावे लागणे, कार्यालयांमध्ये कमालीची अस्वच्छता आहेच. त्याबद्दल तक्रार केली की कोरोनासोबत राहण्याची सवय करा, असा सल्‍ला आमचे वॉर्ड अधिकारी देत असल्याचे एका कर्मचार्‍याने सांगितले.