होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात प्रसूतीनंतर बाळंतिणीचा मृत्यू

ठाण्यात प्रसूतीनंतर बाळंतिणीचा मृत्यू

Published On: Aug 29 2018 1:43AM | Last Updated: Aug 29 2018 1:01AMठाणे : प्रतिनिधी

प्रसुतीनंतर गर्भाशयाचे न झालेले आंकुचन, अंतर्गत रक्तस्त्राव यामुळे लोकमान्य नगर येथे राहणार्‍या एका 27 वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यामुळे काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकारामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

लोकमान्य नगर येथे राहणार्‍या सोनिका प्रवीण जाधव (27) ह्या प्रसुतीसाठी जिल्हा सामान्य (सिव्हील) रुग्णालयात रविवारी मध्यरात्री दाखल करण्यात आले होते. रविवारी मध्यरात्री 1.30 च्या सुमारस जाधव यांची सिझेरिंगद्वारे प्रसुती झाली. त्यांनी गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, सोमवारी दुपारपासून सोनिकाची प्रकृती बिघडली.

ही गोष्ट डॉक्टर्स व परिचारिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही गोष्ट वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने तात्काळ सोनिकावर पुन्हा शस्त्रक्रिया केली. तसेच जिल्हा रुग्णालयातील स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टरांसह कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील ज्येष्ठ स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर तिच्यावर उपचारासाठी बोलवण्यात आले होते.

प्रसुतीनंतर गर्भाशय आंकुचन न झाल्यामुळे त्यांच्या शरीरात अंतर्गत रक्‍तस्त्राव सुरू झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरू असताना हा रक्तस्त्राव थांबावा, यासाठी 9 बाटल्या सफेद रक्त (प्लाझमा), एक बाटली सफेद पेशी आणि रक्ताच्या बाटल्या चढवण्यात आल्या, असा दावा रुग्णालय प्रशासनाने केला. मात्र, रुग्णालय प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांना अपयश आल्याने मंगळवारी स. 6 च्या सुमारास तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात नातेवाईक जमण्यास सुरुवात झाली. काही नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नातेवाईकांच्या मागणीनुसार मृतदेह जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला.