Mon, Mar 18, 2019 19:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आशाबाईंचे आयेशा बी करून पोस्टमार्टेम अन् दफनविधी

आशाबाईंचे आयेशा बी करून पोस्टमार्टेम अन् दफनविधी

Published On: Apr 24 2018 2:02AM | Last Updated: Apr 24 2018 12:44AMमुंबई : वार्ताहर 

विक्रोळी टागोर नगर परिसरात जैन मंदिर शेजारी राहणार्‍या 67 वर्षीय आशाबाई काशीराम मुळे या वृद्धेचे कुणी नातेवाईक आणि वारसदार नसल्याने जमील रेतीवाला याने वृद्धेचा अंत्यसंसकार कुणालाही विचारात न घेता  मुस्लिमांच्या कब्रस्थानमध्ये दफन केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते देविदास कुचेकर (जाधव), सुभाष गुप्ता, अशोक कोठारी आणि महेंद्र मगरे यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात केली आहे. 

आशाबाई काशीराम मुळे यांचा मृत्यू 19 एप्रिल रोजी झाला. त्यांना मुलबाळ, वारसदार  आणि नातेवाईक नसल्याने आशाबाई यांच्या मालकीचा रूम  आणि दागिने हडपण्यासाठी एका हिंदू महिलेला मुस्लिम ठरवून तिच्यावर अंत्यसंस्कार मुस्लिम दफनभूमीत करण्यात आल्याने   विक्रोळीत संताप व्यक्त होत आहे. वृद्धेच्या मृत्यूनंतर कुठलेही शवविच्छेदन न करता विक्रोळीतील खाजगी डॉक्टर भानुशाली यांचे प्रमाणपत्र घेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत पोलिसांना स्थानिक नगरसेवकालाही कळविण्यात आले नाही. तसेच स्म्शानभूमीच्या नोंदवहीत ही आशाबाई खोडून त्याठिकाणी आयेशा बी काशीराम मुळे असे लिहिण्यात आले. तसेच वृद्धेचे दागिने काढून घेऊन तिच्या घरातील अन्य दस्तावेज हे लांबविण्यात आले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. 

अंत्यसंस्कारानंतर प्रकरण चव्हाट्यावर आल्याने आता आशाबाई मुळे या मुस्लिम धर्मियांसारखे वागत होते. त्यांचे वडीलही मुस्लिम असल्याचा जावई शोध जमील रेतीवाला आणि त्याचे सहकारी यांनी लावला. दरम्यान आशाबाई यांचा मृत्यू संशयास्पद असून त्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते देविदास  कुचेकर (जाधव), सुभाष गुप्ता, अशोक कोठारी आणि महेंद्र मगरे यांनी केली आहे.  अन्यथा आंदोलनाचा पर्याय स्वीकारावा लागेल अशी माहिती जाधव, गुप्ता आणि कोठारी यांनी दिली. दरम्यान या घटनेने विक्रोळी परिसरात संताप व्यक्त होत आहे.

Tags : Mumbai, Dead woman ,Tried to be a Muslim, Mumbai news,