Fri, Mar 22, 2019 01:27
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दाऊदचा साथीदार टकला अटकेत!

दाऊदचा साथीदार टकला अटकेत!

Published On: Mar 09 2018 2:06AM | Last Updated: Mar 09 2018 1:55AMनवी दिल्ली/ मुंबई : पुढारी वृत्तसेवा

अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिम याचा साथीदार मोहम्मद फारूख ऊर्फ फारूख टकलाला पोलिसांनी अटक केली आहे. फारूखला दुबईवरून परत आणताच सीबीआयने त्याला विमानतळावरून अटक केली. फारूख टकलाला दुपारी टाडा न्यायालयात हजर करण्यात आले.

मुंबईतील 1993 मधील साखळी बॉम्बस्फोटानंतर फारूख टकला भारतातून पळून गेला होता. 1995 मध्ये त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. फारूख टकला हा मुंबई बॉम्बस्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहिमच्या गँगमध्ये होता. दाऊदच्या विश्‍वासू साथीदारांपैकी तो एक होता. 1993 च्या बॉम्बस्फोटांचा कट रचण्यात त्याचादेखील सहभाग होता. 57 वर्षीय टकला दाऊदचे दुबईतील काळे साम्राज्य सांभाळत होता. 

यासिर मन्सूर मोहम्मद फारूख असे त्याचे पूर्ण नाव असून तो अंडरवर्ल्डमध्ये फारूख टकला नावाने ओळखला जातो. डी कंपनीची दुबईतील जबाबदारी त्याच्याकडे होती, असे सांगितले जाते. फारूख टकलाला दुबईतून ताब्यात घेण्यात आले. बुधवारी रात्री उशिरा त्याला दिल्‍लीत नेण्यात आले. तेथून गुरुवारी सकाळी टकलाला मुंबईला आणण्यात आले. मुंबई पोलिसांनी त्याला विमानतळावरून अटक केली. 

दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणे, हवाला रॅकेटमध्ये सहभाग

अरुण गवळी टोळीशी भडका उडाल्यानंतर फारूख टकला याने 1992 साली मुंबईतून पळ काढला. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींना दुबईमार्गे कराचीत नेण्याचे काम तो करीत होता. दुबईमध्ये काळे धंदे करण्यास तो मदत करीत असे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींना कराचीत नेऊन बॉम्बस्फोटाचे प्रशिक्षण देण्याचे कामही तो करीत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. आखाती देशात वास्तव्य करूनच तो हवाला व्यवहारही सांभाळत होता, असे सूत्रांनी सांगितले.