होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खंडणी मागणारा दाऊदचा साथीदार अटकेत

खंडणी मागणारा दाऊदचा साथीदार अटकेत

Published On: Dec 25 2017 1:42AM | Last Updated: Dec 25 2017 1:12AM

बुकमार्क करा


मुंबई : प्रतिनिधी

बिग बॉसचा स्पर्धेक जुबेर खान याची पाठराखण केल्यानंतर प्रसिद्धीझोतात आलेल्या शबनम हमीद खान या खासगी संस्थेच्या संचालिका आणि कापड व्यावसायिकाला एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी बिलाल कुतुबुद्दीन शमशी या  आरोपीस शनिवारी खंडणीविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. तो दाऊदचा खास सहकारी म्हणून परिचित आहे. त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. 

वांद्रे येथे राहणार्‍या शबनम खान खार येथील हेल्थ केअर फाऊंडेशनमध्ये संचालिका आहेत. त्यांची  धारावीत शबनम गार्मेंट नावाची एक कंपनी आहे. काही दिवसांपासून त्यांना पाकिस्तानातून वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून उस्मान चौधरी एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकी देत आहे. त्याच्यासह दाऊद आणि छोटा शकीलनेही त्यांना धमकी दिल्याचा आरोप केला होता. याबाबत त्यांनी खार पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच त्याचा तपास खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला होता. 

हा तपास हाती येताच 18 डिसेंबरला दिल्लीतील रोहतक रोडवरून हरिशकुमार नरेशकुमार यादव याला पोलिसांनी अटक केली. चौकशीत बिलालचे नाव समोर आले होते. हरिशकुमार याचे ललित शर्मा या व्यक्तीशी ओळख होती. त्याच्या पत्नीशी हरिशकुमारचे अनैतिक संबंध होते. त्याने ललितला पोलिसांकडून खोट्या गुन्ह्यांत अटक करण्यास भाग पाडू अशी धमकी दिली होती. त्यानंतर ललितने शबनम खानचा मोबाईल क्रमांक त्याला दिला होता. 

मोबाईल क्रमांक मिळाल्यानंतर हरिशकुमार बिलाल, उस्मानसह इतरांनी त्यांना एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकी दिली होती. या गुन्ह्यांत बिलालचा सहभाग उघडकीस येताच त्याला शनिवारी वांद्रे येथून पोलिसांनी अटक केली. बिलालची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असून त्याच्याविरुद्ध काही गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तो दाऊद आणि छोटा शकीलच्या संपर्कात होता असेही बोलले जाते. या गुन्ह्यांत दाऊद, छोटा शकील, उस्मान चौधरी, ललित शर्मा आणि फईम मचमच या आरोपींना पाहिजे आरोपी दाखवण्यात आले आहे.