Thu, Apr 25, 2019 13:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हवालामार्फत पोहोचले दाऊदला 150 कोटी

हवालामार्फत पोहोचले दाऊदला 150 कोटी

Published On: Mar 09 2018 2:06AM | Last Updated: Mar 09 2018 1:50AMठाणे : प्रतिनिधी

डी. कंपनीच्या मदतीने सुमारे 600 कोटींची मुंबईच्या गोराईमधील 37 एकर जमीन हडप केल्याची कबुली दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याने ठाणे खंडणीविरोधी पथकाने केलेल्या चौकशीत दिली आहे. एवढेच नाही तर या व्यवहारातील 150 कोटी रुपये हे हवालामार्फत दाऊदला पाठविण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.  

गोराई येथील 37 एकर जमिनीच्या व्यवहारात हस्तक्षेप करीत 3 कोटींची खंडणी उकळल्याप्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाने दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला अटक केली आहे. या खंडणी प्रकरणाचा गुन्हा ऑक्टोबर 2017 मध्ये ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. यापूर्वीच्या दोन गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या कासरकरला ठाणे खंडणीविरोधी पथकाने पोलीस कोठडीत घेतले असून शुक्रवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

गोराई येथील विविध शेतकर्‍यांकडून 1986 मध्ये टुनिव्हेलिस याने 37 एकर जमीन खरेदी केली होती. 2007 मध्ये या जमिनीचा व्यवहार बिल्डर श्यामसुंदर अग्रवाल यांच्या बालाजी इंटरप्राईजेस यांच्याशी करण्यात आला. त्याच्या एमओयूसाठी दोन कोटींची अनामत रक्कमही जमीनमालकाने घेतली आणि  जमिनीचा ताबा दिल्यानंतर 15 कोटी रुपये देण्याचा सौदा ठरला होता. त्यानुसार एमओयू झाला. मात्र जमिनीचा ताबा न मिळाल्याने पुढील व्यवहार रखडला. जमिनीचे भाव वाढले आणि मूळ मालकाने बिल्डरकडील व्यवहार मोडण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यास बिल्डरने नकार दिल्याने जमीन मालकाने भवर कोठारी आणि भरत जैन यांची मदत घेतली. 

भवर कोठारी हा दाऊद इब्राहिमचा लहानपणापासूनचा मित्र असल्याने त्याने याप्रकरणात  डी.गँगला सामील केले आणि जमीनमालक टुनिव्हेलिस याच्याशी व्यवहार करून जमीन हडप केली. त्यासाठी इक्बाल कासकर, दाऊद इब्राहिम आणि अनिस इब्राहिमच्या मार्फत जीवे ठार मारण्याची धमकी देऊन बालाजी बिल्डरला व्यवहारातून बाजूला होण्यास भाग पाडले. जमीन मालकाला दिलेले दोन कोटी रुपये हडप करून आणखी एक कोटी रुपयांची मागणी कासकर याने करून बिल्डरला धमकावले.  त्यानंतर भवर कोठारीने 37 एकर जमीन आपल्या कंपनीच्या नावे केली. या जमिनीची किंमत सुमारे 600 कोटी रुपये आहे. मात्र जमीन मालकाने सदरची जमीन ही मुलींना गिफ्ट दिल्याचे दाखविले असून तसे गिफ्ट डीड देखील करण्यात आलेले आहे. 

जमीनमालकाच्या मुली आता दाऊदचा मित्र भवर कोठारी याच्या कंपनीत भागीदार बनलेल्या आहेत, अशी माहिती पोलीस चौकशीतून समोर आली आहे. त्यामुळे या खंडणीप्रकरणी आरोपी भवर कोठारी, भरत जैन आणि जमीन मालक पोलिसांना हवे आहेत.  या खंडणी आणि जमीन व्यवहारात डी. कंपनी सामील असून हा गुन्हा केल्याची  कबुली इक्बाल कासकर यांनी दिली आहे. तसेच हवालामार्फत 150 कोटी रुपये दाऊद इब्राईमला पोहचले असल्याची बाब समोर आलेली असल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केलेला आहे. भवर याने एवढा पैसा कुठून आणला, या व्यवहारात कुणी पैसे गुंतविलेले आहेत, याची पाळेमुळे खोदण्याचे काम चालू असल्याचे ठाणे खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी सांगितले.