Tue, Apr 23, 2019 19:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दाऊद भारतात येण्यास तयार, पण त्याची एक अट...

दाऊद भारतात येण्यास तयार, पण त्याची एक अट...

Published On: Mar 07 2018 2:08AM | Last Updated: Mar 07 2018 9:16AMठाणे : नरेंद्र राठोड

दाऊद इब्राहिमला भारतात परत यायचे आहे; पण त्याची एक अट आहे, त्याच्यावर भारतात खटला सुरू असताना त्याला फक्‍त आर्थर रोड तुरुंगातच ठेवण्यात यावे, अशी खळबळजनक माहिती दाऊदचे फॅमिली वकील व सध्या इकबाल कासकरचा खटला लढवत असलेले वकील अ‍ॅड. श्याम केसवाणी यांनी मंगळवारी ठाणे कोर्टात दिली.

ठाण्यातील दोघा बिल्डर व एका ज्वेलर्सकडून खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर सध्या ठाणे तुरुंगात आहे. त्याच्यावर ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यात एक व ठाणेनगर पोलीस ठाण्यात दोन असे एकूण तीन खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, दोन खंडणीच्या गुन्ह्यांत इकबालला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर खंडणीविरोधी पथकाने गोराई येथील जमीन प्रकरणात बिल्डरकडून खंडणी उकळल्याच्या तिसर्‍या गुन्ह्यात इकबालला पुन्हा पोलीस कोठडी चौकशीसाठी घेतली आहे. या तिसर्‍या गुन्ह्यातील सहा दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर इकबालला मंगळवारी ठाणे विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी दाऊदचे फॅमिली वकील आणि इकबालचा खटला लढवत असलेले ज्येष्ठ वकील श्याम केसवाणी यांनी ही माहिती दिली.

दाऊद सध्या कुठे आहे, या प्रश्‍नावर केसवाणी म्हणाले की, दाऊद कुठेही असला, तरी त्याने मुंबईत परतण्याची स्वत:हून इच्छा  व्यक्‍त केली आहे. सरकारने दाऊदविरोधात हवा तो खटला चालवावा. मात्र, हा खटला चालेपर्यंत त्याला फक्‍त आर्थर रोड तुरुंगातच ठेवण्यात यावे, अशी दाऊदची मागणी आहे.

दाऊदने यापूर्वीदेखील भारतात परतण्याची इच्छा व्यक्‍त केली होती का? या प्रश्‍नावर केसवाणी म्हणाले की, दाऊद मुंबईत येणास तयार आहे, तर सरकारने तशी पावले उचलावी आणि योग्य मध्यस्थीमार्फत वाटाघाटी सुरू कराव्यात. मात्र, दाऊदला भारतात आणण्यास काही अडचणी असल्याचे सरकारमधीलच काही लोक बोलत आहेत.

तीन दिवसांची पोलिस कोठडी

खंडणीविरोधी पथकाने गोराई येथील जमीन प्रकरणात बिल्डरकडून खंडणी उकळल्याच्या तिसर्‍या गुन्ह्यात इकबालला पुन्हा पोलिस कोठडी चौकशीसाठी घेतली आहे. यावेळी पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास अद्याप सुरू असून, इकबालच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी विनंती न्यायालयाला केली. त्यानुसार ठाणे विशेष न्यायालयाने इकबालच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ केली.

दाऊदने इकबालला पाठवलेल्या ‘त्या’ निरोपाची पोलिसांकडून चौकशी

दाऊदचा मुलगा मोईन नवाज कासकर आपल्या वडिलांच्या काळ्या व्यवसायापासून दूर राहून धार्मिकतेकडे वळला आहे. त्याला आपल्या वडिलांच्या बेकायदेशीर साम्राज्यात अजिबात रस नसून, तो मौलवी बनल्याची खळबळजनक माहिती अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा अटकेत असलेला भाऊ इकबाल कासकर याने पोलिसांना दिली होती. आपल्या मुलाची माहिती पोलिसांसमोर उघड केल्यामुळे दाऊद आपला भाऊ इकबालवर प्रचंड नाराज असून, तसा निरोपच दाऊदने इकबालला त्याचाच मुलगा रिझवान कासकरमार्फत ठाणे तुरुंगात पाठवला होता. दीड महिन्यापूर्वी इकबालची त्याचा मुलगा रिझवान आणि अनिस इब्राहिमचा मुलगा आरिश यांनी भेट घेतली होती.

यावेळी दोघांनी दाऊदचा निरोप इकबालपर्यंत पोहोचवल्याचे वृत्त आहे. दरम्यान, ठाणे खंडणीविरोधी पथक आता दाऊदने पाठवलेल्या त्या निरोपाची कसून चौकशी करत आहे. दाऊदने इकबालला काय निरोप पाठवला होता व त्याला कोण-कोण भेटण्यास आले होते याचीदेखील चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आपल्या कुटुंबीयांसंबंधीची माहिती तपास यंत्रणांना देऊ नये, असा निरोप दाऊदने दोघांमार्फत पाठवल्याच्या वृत्तात तथ्य आहे का, याचीदेखील पडताळणी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.