Wed, Apr 24, 2019 01:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पडसलगीकरांना ३ महिने मुदतवाढ?

पडसलगीकरांना ३ महिने मुदतवाढ?

Published On: Aug 25 2018 1:44AM | Last Updated: Aug 25 2018 1:44AMनवी मुंबई : राजेंद्र पाटील 

राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर हे येत्या 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होणार असले तरी त्यांना आणखी तीन महिने मुदतवाढ दिली जाण्याचे स्पष्ट संकेत वरीष्ठ अधिकार्‍यांनी पुढारीशी बोलताना दिले. 

गृहखात्यातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  पडसलगीकर ठरल्याप्रमाणे निवृत्त झाले असते तर पोलीस महासंचालक पदी विद्यमान मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांची वर्णी लागणे जवळ-जवळ निश्‍चित झाले होते. मात्र तूर्तास ही शक्यता मावळली आहे. पडसलगीकर यांनामुदतवाढ देण्यास राज्य सरकार अनूकूल असून  सुरुवातीला राज्याकडून तीन महिने आणि नंतर केंद्राकडून तीन महिने अशी सहा महिन्यांची मुदतवाढ पडसलगीकर यांना दिली  जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहेे. पडसलगीकर यांना मुदतवाढ देण्याचा आग्रह खुद्द राज्यसरकारचा असून त्यामागे मुंबई पोलीस आयुक्‍त पदाचे संभाव्य गणिते असल्याचे सांगितले जाते. गेल्या 30 जून रोजी तत्कालीन मुंबई सीपी दत्ता पडसलगीकर यांची पोलीस महासंचालक पदी नियुक्‍ती झाली. तर मुंबई पोलीस आयुक्त पदी केंद्रातुनच प्रतिनियुक्तीवर आलेले सुबोध जयस्वाल यांची वर्णी लागली. पडसलगीकर इतक्यात निवृत्त झाल्यास नव्या महासंचालक कोण अन् त्यापेक्षाही नवा पोलीस आयुक्‍त कुणाला करायचे हा मोठा गंभीर पेच सरकारला सोडवावा लागणार होता. पडसलगीकरांना मुदतवाढ दिल्यास हा पेच सुटतो आणि  मुंबई पोलीस आयुक्‍ताचा फैसला सहा महिन्यानंतर हवा तसा घेण्यासाठी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे आडाखे शासनस्थरावर मांडले गेले आहेत. 

गेल्या दोन वर्षांत 1977 ते 1981 च्या बॅचचे सहा आयपीएस अधिकारी सेवानिवृत्त झाले. त्यात प्रविण दीक्षित, अहमद जावेद, बी.आर.कांबळे, एस.सी.माथुर, राकेश मारिया, मीरा बोरवणकर यांचा समावेश आहे. तर 1983 च्या बॅचचे के.के.पाठक, 1984 च्या बॅचचे प्रभात रंजन, विष्णु देव मिश्रा, सुर्या प्रताप गुप्ता, के.एल.बिश्‍नोई हे देखील निवृत्त झाले. येत्या सप्टेंबर अखेर एस.पी.यादव हे सेवानिवृत्तीच्या वाटेवर आहेत. तर 1987 च्या बॅचचे पाच आयपीएस अधिकारी स्पर्धेत राहणार असले तरी त्यातील दोन ते तीन अधिकारी निवडणुकीआधीच निवृत्त होतील. त्यामुळे मुंबई सीपीसाठी 1987 च्या बॅचच्या अधिकार्‍याची निवडणुकीच्या तोंडावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.